देशाच्या विकासाला हातभार लावणारा कलम 39(ए) आहे – न्यायमूर्ती, नितीन जामदार

बारामती(वार्ताहर): देशाच्या विकासाला हातभार लावणारा कलम 39(ए) असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय तथा पालक न्यायमूर्ती पुणे न्यायिक जिल्ह्याचे नितीन जामदार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व तालुका वकील संघ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती जामदार बोलत होते.

यावेळी मुंबई उच्च न्यायालय तथा पालक न्यायमूर्ती पुणे न्यायिक जिल्ह्याचे एस.पी. तावडे, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश संजय देशमुख, सचिव प्रताप सावंत, बारामती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व अति.जिल्हा सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकर, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत सोकटे मान्यवर उपस्थित होते.

पुढे न्यायमूर्ती जामदार म्हणाले की, कलम 39(ए) नुसार हा कार्यक्रम होत असून, आपण सर्व एक आहोत. तीन तास सांगू शकलो नसतो ते पथनाट्यातून दहा मिनीटाने सांगितले. विधी सेवक आपले सैनिक आहोत व या कार्यक्रमाचे खरे सैनिकही ते आहेत. नुकताच संविधान दिन साजरा केला. सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय हे मिळविण्यासाठी समान न्याय मिळत नाही त्यामुळे संविधानाचा मूळ उद्देश बाजुला राहिला आहे. 1976 साली 39(ए) मांडले गेले. 50 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्या समाजातील सर्व स्तराला न्याय मिळण्यासाठी योग्य संधी मिळत नाही त्यामुळे प्रयत्न वाढवावे लागणार आहे. त्यासाठी नालसातर्फे भारतभर अखिल भारतीय कायदेविषयक जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित केला आहे.

पैश्याच्या अडचणीमुळे, कायद्याची तरतुद माहिती नाही म्हणून लोक न्यायापासून वंचित राहतात. या कारणासाठी न्यायालयात पोहचू शकत नाही तर स्वत:च्या समस्या कायदा हातात घेऊन किंवा गुन्हेगारी मार्गाने न्याय मिळविण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. समाजात शांतता नसेल तर देशाचा विकास होऊ शकत नाही. याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. खटले प्रलंबित आहे असे म्हटले जाते. वकिलांवर, सुट्‌ट्यांवर राग-राग केला जातो. मात्र, एवढे खटले दाखल होतात कसे याबाबत विचार करण्याची गरज आहे. खटले दाखल होण्यासाठी नागरीकांचा अप्रामाणिकपणा हे महत्वाचे कारण आहे. समाजात परिवर्तन होणे गरजेचे आहे.

वकिलांच्या सहकार्याने बारामतीमध्ये गेल्या तीन चार वर्षात 2 हजार 500 खटले संपुष्टात आले. या कुटुंबाला स्थैर निर्माण झाले, शांतता निर्माण झाली.

बारामती विधी व सेवा समितीच्या पॅनेलवरील 21 वकीलांचे कौतुक केले. विधी सेवक गणेश शेलार, अमोल सानवणे, चित्रा वाघमोडे, रविंद्र यादव,रिना साबळे, अजित शेरकर घरोघरी जावून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात यांचे विशेष कौतुक केले.

यावेळी न्यायाधीश संजय देशमुख, न्यायाधीश एस.पी.तावडे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला कायद्याचा जागर हे पथनाट्य सादर करण्यात आले. प्रेरणादायी गीतानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

पाहुण्यांचा सत्कार बारामती, दौंड व इंदापूर येथील वकील संघटनेच्या कार्यकारिणी तर्फे करण्यात आला. लाभार्थ्यांना चेकचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. पथनाट्य सादर केलेल्या दिग्दर्शक, प्रमुख भूमिका बजाविणार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.चंद्रकांत सोकटे यांनी केले. 2 ऑक्टोबर पासून बारामती विधी सेवा समिती व बारामती वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड.प्रिया महाडीक यांनी केले तर शेवटी आभार अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!