बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यकारिणी निवडणूकीत बारामती शाखेचे डॉ.अविनाश आटोळे यांची उपाध्यक्षपदी तर डॉ.महेंद्र दोशी व डॉ.अमरसिंह पवार यांची केंद्रीय कमिटी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकत्याच मुंबई येथे झालेल्या निवडणूक बैठकीत नूतन राज्य कार्यकारणी निवडीची घोषणा करण्यात आली.
आयएमए बारामती शाखेचे सचिव डॉ.संतोष घालमे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे जेष्ठ सदस्य व माजी अध्यक्ष डॉ.अशोक तांबे यांचे बारामती शाखेला महत्वपूर्ण मार्गदर्शन असल्यामुळेच हे साध्य होऊ शकले. तीन सदस्य राज्य कार्यकारिणीवर गेल्याचे बारामती शाखेच्यादृष्टीने अभिमानास्पद व उत्साहवर्धन बाब आहे.
यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेषत: अहमदनगर येथील दुर्दैवी घटनेत प्रशिक्षणार्थी डॉक्टर व नर्सेसवर जी अन्यायकारक कारवाई केली गेली त्याचा एकमुखाने निषेध करण्यात आला. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत वैद्यकीय विद्यार्थ्यांना पाठबळ देऊन मानसिक खच्चीकरण होऊ न देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात असेही बैठकीत ठरले.
बारामती आयएमए शाखेच्या अध्यक्षा डॉ.विभावरी सोळुंके, सहसचिव डॉ.दिपीका कोकणे, खजिनदार डॉ.सौरभ मुथा, माजी अध्यक्ष डॉ.संजय पुरंदरे, उपाध्यक्ष डॉ.बापूसाहेब भोई, डॉ.सचिन घोळवे इ.विविध सदस्यांनी वरील परिषदेत सहभाग नोंदवला.