अशोक घोडके यांजकडून…
इंदापुर: ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या आढावा बैठकीत केले.
यावेळी पंचायत समिती सभापती प्रशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री प्रताप पाटील, प्रवीण माने, हनुमंत बंडगर, अभिजित तांबिले, वैशाली पाटील, तहसिलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकरी विजय कुमार परिट आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. भरणे म्हणाले, या योजनेअंतर्गत ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वाटप करण्यात येणार आहेत. 6 ते 9 डिसेंबर 2021 या कालावधीत बावडा जंक्शन, भिगवन आणि इंदापूर येथे सी.एस.सी. सेंटरच्या माध्यमातून तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. जेष्ठ व दिव्यांग नागरिकांनी यात सहभाग घ्यावा. तालुक्यातील सर्व जनतेपर्यंत या योजनेची माहिती मिळून या सेवेचा लाभ मिळणे आवश्यक आहे व त्यासाठी आपण लक्ष घालू. गटविकास अधिकारी, तहसिलदार, उपजिल्हा रुग्णालय प्रशासन, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पुढाकार घेऊन ही योजना यशस्विपणे राबवावी, असे निर्देश श्री. भरणे यांनी दिले.
कोरोना बाबत बोलतांना श्री. भरणे म्हणाले, आता रुग्ण संख्या आटोक्यात आली असली तरी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत. मास्क वापरावे, सामाजिक अंतर ठेवावे व वारंवार हात धुवावेत या त्रिसुत्रीचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गटविकास अधिकारी श्री. परीट म्हणाले, इंदापूर तालुक्यात 1632 दिव्यांग आणि 40 हजार ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी 32 व दिव्यांगासाठी 22 प्रकारचे मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे. तरी गरजूंनी यावा आवश्यक लाभ घ्यावा. ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविकांनी संबंधितांची कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी तालुक्यातील लसीकरणाची सद्यस्थिती सांगितली.