अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): पाचटात 40 ते 50 ग्रॅम नत्र, 20 ते 30 ग्रॅम स्फुरद व 75 ते 100 ग्रॅम पालाश पुढील पिकास उपलब्ध होत असल्याने शेतकर्यांनी पाचट न जाळता ते कुजवण्याचे आवाहन मंडल कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत, मंडल कृषी अधिकारी कार्यालय सणसर यांच्यामार्फत इंदापूर तालुक्यातील मौजे भरणेवाडी येथे प्रगतशील शेतकरी निलेश पांडुरंग धापटे त्यांच्या शेतावरती ऊस खोडवा उत्पादन व पाचट व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना श्री.वाघमोडे म्हणाले की, आडसाली ऊसातून दर हेक्टरी 8 ते 12 टन पाचट निघते. आज जर ऊस पिकाचा विचार केला तर जवळपास 70 टक्के शेतकरी उसाचे पाचट जाळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हवेचे प्रदूषण होते. उष्णतेमुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणू व गांडूळ यावरती परिणाम होतो.तेच पाचट जर शेतकर्यांनी कुजवले तर जमिनीला उपयुक्त अन्नद्रव्ये मिळतात व जमिनीची सुपीकता वाढून जमीन अधिक उत्पादनक्षम बनते तसेच पाचट व्यवस्थापनामुळे पाणी व वीज बिलात बचत व तन नियंत्रण होते. त्यामुळे उत्पादन, मशागती या खर्चामध्ये 50 टक्के बचत होते.
छत्रपती साखर कारखान्याचे संचालक गोपीचंद शिंदे व ऊस विकास अधिकारी प्रविण कांबळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, पाचट कुजवण्यासाठी प्रति एकरी 45 किलो ग्रॅम युरिया,50 किलो ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व पाच किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन सेंद्रिय खतात मिसळून पाचटकुट्टी केल्यानंतर पाचटावर टाकावे, त्यामुळे पाचट लवकर कुजेल.
याप्रसंगी कृषी विभागाच्या विविध योजना, पीक पाहणी मार्गदर्शन, पीक विमा योजना, कृषक ऍप डाऊनलोड करणे या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले कृषी पर्यवेक्षक श्री.चंद्रकांत सुतार व कृषी सहाय्यक पी.बी.ननावरे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय कृषी अधिकारी बारामती वैभव तांबे व तालुका कृषी अधिकारी इंदापूर भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन, प्रास्ताविक व आभार कृषी सहाय्यक पी.बी.ननावरे यांनी मानले.
या कार्यक्रमास श्री छत्रपती साखर कारखान्याचे व बारामती ऍग्रो कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी,कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ नरुटे-पाटील, भरणेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ सदस्य व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.