कष्टकर्यांच्या श्रमाचा आणि उत्पन्नाचा मोबदला शिक्षण स्वरूपात मिळायला हवा तसेच आपले नैसर्गिक मानवी अधिकार त्यांना नि:शंकपणे भोगता यावेत यासाठी अशिक्षितपणाची बेडी निखळून पडलीच पाहिजे. केवळ साक्षरता पुरेशी नाही, तर सुशिक्षितपणा आवश्यक आहे. या संदर्भातील जोतीरावांचे आग्रह अतिशय महत्वाचे आहेत. इंग्रज शासनव्यवस्थेत कारकूनी करण्यात शिक्षणाची इतिकर्तव्यता नाही. पदवीशिक्षण घ्यायचे आणि सरकारदरबारची नोकरी मिळवण्यात धन्यता मानावयाची, किंबहुना त्या नोकरीसाठीच शिक्षण घ्यायचे हे समीकरणच त्यांना खोडून काढावयाचे होते. शिक्षणाने व्यवसाय-कौशल्य वाढीस लागावे, व्यवहारज्ञान उत्पन्न व्हावे आणि त्यातून नोकरीच्या मागे न लागता स्वयं रोजगाराची स्वतंत्र व्यवसायाची द्वारे खुली व्हावीत ही जोतीरावांची कल्पना होती. शूद्र मुलीमुलां शाळेत घालावे, सुशील करावे सर्व कामी ही त्यांची तळमळ होती. शिक्षणविषयक त्यांची कल्पना केवळ विद्यार्जना पुरतीच मर्यादित नव्हती आणि म्हणूनच विद्वान व विद्याव्यासंगी व्यसनाधीन बनतात याचा खेद त्यांनी वेळोवेळी प्रकट केला आहे. कोरड्या ज्ञानसाधनेत जीवनसाफल्य नाही तर ज्ञानाला सत्वसंपन्नतेचीही जोड असलीच पाहिजे अशी त्यांची दृढ धारणा होती. या धारणेपोटीच त्यांनी नीतिशिक्षणावर भर दिला. शिक्षणातून शीलसंवर्धन, सत्यनिष्ठा, नीतिमत्ता, सौजन्य, प्रगतीपर विचार आणि व्यवहारज्ञान या गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत यावर त्यांचा कटाक्ष होता.
शिक्षकांविषयीही ते अतिशय कठोरपणे बोलत. उच्चवर्णीय शिक्षकांकडून शूद्रांना योग्य शिक्षण दिले जाणार नाही, गुलामगिरीचे पाश तोडून टाकण्याचे शिक्षण देणे हे वरिष्ठ वर्गाच्या हितसंबंधालाच धक्का देणारे असल्यामुळे वर्णव्यवस्थेला सुरुंग लावण्याची प्रेरणा देणारे शिक्षण उच्चवर्गीयांकडून मिळेल अशी अपेक्षा बाळगणे मूर्खपणाचे ठरेल याची पक्की खूणगाठ त्यांनी मनाशी बाळगली होती. मनू तुम्ही शिक्षक बनावे, त्यांना हटवावे सत्यामध्ये या त्यांच्या मांडणीतून त्यांची भूमिका स्पष्ट होते. मनूंनी आपल्या संस्कृत विद्यालयात शूद्र शेतकर्यांच्या मुलांस घेत नाहीत, परंतु ते प्राकृत मराठी भाषेपुरते घेतात- मग वरिष्ठ नोकर्यांत ते कसे येतील? असे अतिशय तर्कशुद्ध विवेचन त्यांनी केले. हिंदुसमाजातील जातींमध्ये शिक्षणाची काही प्रगती झालेली असली तरी त्यांच्या सामाजिक अभिसरणाचे क्षेत्र सामान्यतः आपापल्या जातींपुरते मर्यादित होते ही तत्कालीन समाजव्यवस्थेतील एक दुर्दैवी वस्तुस्थिती होय. अशा जातिबद्ध समाज व्यवस्थेच्या अंतर्गत एका जातीच्या व्यक्तीचे दुसर्या जातीतील व्यक्तीशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होणे अशक्यप्राय होते. कष्टकरी समाजात शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हायची असेल तर शिक्षकाच्या मनात विद्यार्थ्यांविषयी आत्मियता असणे हेही आवश्यकच. म्हणूनच त्या त्या जातीचे शिक्षकच हे शिक्षणप्रसाराचे कार्य अधिक प्रभावीपणे करू शकतील असे जोतीरावांचे आग्रही प्रतिपादन असे.
सौजन्य : महात्मा फुले जीवन आणि कार्य