लक्ष्मीनगर कसबा बारामती येथील वयोवृद्ध भाजी विक्रेता फारूख इसाकभाई तांबोळी हे प्रामाणिक, होतकरू व गरीब कुटुंबातील होते. गुंड प्रवृत्तीच्या युवक फारूख तांबोळी यांना सतत पैश्याची मागणी करीत होता, ते देण्यास नकार दिल्याने त्याने लोखंडी व्हीलपान्याने डोक्यात मारा केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले बारामतीत उपचार करण्यासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मेंदूवर जोराचा मारा लागल्याने मेंदूची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने पुणे याठिकाणी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
फारूख तांबोळी यांच्या पश्र्चात पत्नी, तीन मोठ्या मुली व एक सहा वर्षाचा छोटा मुलगा आहे. घटना घडले त्यादिवशी लक्ष्मीनगर येथील नागरीकांनी हळहळ व्यक्त केली. शेकडो नागरीक, महिलांनी पोलीस स्टेशन गाठले. अखिल भारतीय मानवी हक्क संघ, तांबोळी समाजाचे पदाधिकारी यांनी कारवाईची मागणी केली. त्यावर तातडीने पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
फारूख तांबोळी यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. मात्र समाजातून तुटपुंजी रक्कम जमा झाली. प्रत्येक समाज मदत कोणाला द्यायची यावर ठरवीत असतो. जवळचा, नात्याचा, गोत्याचा व आपल्या समाजाचा आहे का? हा विचार करीत आहे. गरिबी जन्मता नसते फारूख तांबोळी हे गरीबीवर मात करीत संसाराचा गाडा हाकत होते. अशी घटना घडेल व माझे कुटुंब उघड्यावर पडेल, माझ्या उपचारासाठी पैसे गोळा करावे लागतील. पुढे माझ्या कुटुंबाकडे कोण पाहील याचा विचार सुद्धा त्यांच्या मनात कधी आला नसेल.
गुंडप्रवृत्तीच्या युवकाने आज या वृद्धावर हल्ला करून त्यांचा जीव घेऊन संपूर्ण कुटुंब उघड्यावर आणण्याचे काम केले. आज असे किती गुंड असतील जे वर्ष-वर्ष जेलमध्ये बसून आले आणि आल्यानंतर हाताला काम नाही म्हणून बसून दोन पैसे मिळतील ही वृत्ती त्यांच्यामध्ये वाढत असते आणि वाममार्गाने पैसे गोळा करण्यासाठी ते वाट्टेल ते करण्यास तयार असतात. तुरूंगवास भोगून आला म्हणून एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा तो राहते ठिकाणी परिसरात किंवा आसपास प्रयत्न करीत असतो. अशा गुंडप्रवृत्तीच्या लोकांची सुटका झालेनंतर ते आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करतात याकडेही प्रशासनाने पाहणे गरजेचे आहे.
फारूखभाई हे एकमेव कमविते कुटुंबातील कर्ते पुरूष होते. येणार्या काळात त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेणारे पुढे आल्यास लवकरच हे तांबोळी कुटुंब या दु:खातून बाहेर येतील व मुले स्वत:च्या पायावर उभे राहतील अशी आशा आहे.
ज्या समाजात त्यांचा जन्म झाला त्या समाजाने त्यांच्यासाठी काय केले हा प्रश्र्न समाजातील व्यक्तींनी मनात आणला तर रात्रभर झोप लागणार नाही हे ही तेवढेच सत्य आहे. फारूख तांबोळी हे जरी बारामतीचे रहिवाशी नसले मात्र, व्यवसायासाठी किंवा कुटुंबाच्या उपजिवीकेसाठी नगरहून ते याठिकाणी राहवयास आले होते. बारामतीचा विकास व वाढता परिसर पाहता व्यवसाय करून कुटुंबाची उपजिवीका भागविता येईल हा उद्देश ठेवून त्यांनी बारामतीत भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तांबोळी समाजाचे मुनीर तांबोळी यांनी त्यांच्या परीने सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला. आज कित्येकांनी त्यांच्याकडे पाहुन मदत केली. फारूख तांबोळी हे त्यांचे नात्यातले नसून सुद्धा माणुसकीच्या नात्याने ते पुण्यापर्यंत गेले, धावपळ केली मात्र, शेवटी फारूखभाई सर्वांना सोडून गेले.
आज या फारूख तांबोळी यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्र्न सर्वांना पडलेला आहे. फारूख तांबोळी यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने लक्ष्मीनगर येथील रहिवाश्यांचे रक्ताच्या पलीकडील नाते निर्माण झालेले होते. घटना घडली त्यांच्यासाठी धावणारा प्रत्येक माणूस पाहिला असता, मुस्लीम समाजातील भाजी विक्रेत्यासाठी एवढा जीव तुटत असेल तर जातीवाद करणार्यांसाठी हा खूप मोठा धडा आहे.
आता यापुढे फारूखभाई यांचा भाजी विक्रीचा आवाज ऐकावयास मिळणार नाही. त्यांची लहान मोठ्यांशी असणारी आदरयुक्त भाषा ऐकावयास मिळणार नाही. यापुढे त्यांच्या आठवणी सर्वांबरोबर राहतील. मात्र पुन्हा फारूख तांबोळी यांच्यासारखी घटना घडू नये यासाठी समाज व्यवस्थेने प्रयत्न केले पाहिजे.