भूदान जमीन कर्ज, गहाण व विकता येत नसताना संस्थेने दिले एक कोटीचे कर्ज फौजदारी गुन्हे दाखल न केल्यास सहा.निबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार – विजय कोकरे

बारामती(वार्ताहर): भूदान समितीने दान केलेली जमीन विकता येत नाही, गहाण ठेवता येत नाही व त्यावर कर्ज सुद्धा काढता येत नसताना तरीही संस्थेने एक कोटीचे कर्ज दिले. या संस्थेवर व संस्थेच्या चेअरमन, सचिवांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी पणदरेचे विजय नाना कोकरे यांनी लेखी स्वरूपात दुसर्‍यांदा सहा.निबंधक सहकारी संस्था बारामती यांना कळविले आहे. कारवाई न केल्यास कार्यालयासमोर प्राणांकित उपोषणाचा इशारा सुद्धा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोनकसवाडी (ता.बारामती) येथे गट नं.51 क्षेत्र 38 असून हे सर्व क्षेत्र भूदान समितीचे आहे. क्षेत्राच्या 7/12 सदरी भूदान समितीचे नाव असून केशव आनंदराव कोकरे व इतर 8 लोकांनी मिळून बनावट महाराष्ट्र ग्रामदान नवनिर्माण समिती निर्माण करून निरावागज येथील श्री वाघेश्र्वरी वि.का.स.सहकारी संस्थेमार्फत एक कोटीचा बोजा चढवला असल्याचे कोकरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सदरचे क्षेत्र व संस्थेने केलेले सभासद संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील असताना बेकायदेशीर सभासद करून कर्ज पुरवठा केला. वरील 9 लोकांनी दि.10 सप्टेंबर 2019 रोजी सभासद करणेबाबत अर्ज केला. संस्थेत 11 सप्टेंबर 2019 ला जमा केला. दि.13 सप्टेंबर 2019 ला संस्थेच्या मासिक कमिटी सभेत सभासद मंजुरी दिली. संस्थेने लागलीच दि.19 सप्टेंबर 2019 रोजी कर्ज मंजूरीसाठी जिल्हा बँकेला सादर केले. संस्थेने एवढा आटापिटा केला मात्र वरील लोकं संस्थेचे सभासद झाले त्यावेळी कोणतेही क्षेत्र म्हणजे गट नं.51 किंवा कोणत्याही गटाचा 7/12 यांच्या नावावर नव्हता. उलट दि.25 सप्टेंबर 2019 रोजी या क्षेत्राचा फेरफार (फेरफार क्र.3927) झाला आहे.

या सर्व कर्ज प्रकरणात खुप मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे नाकरता येत नाही असेही श्री.कोकरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. संस्थेने या नऊ व्यक्तींच्या नावावर प्रत्येकी 7 लाख रूपयांचा पीक कर्जाचा बोजा चढवला असून सहा व्यक्तींवर प्रत्येकी 6 लाख रूपयांचा मध्यम मुदत कर्जाचा फेरफार नं.3947 ने बोजा चढवला आहे. उर्वरीत तीन व्यक्तींनी दि.30 जानेवारी 2020 रोजी प्रत्येकी 6 लाख रूपये मध्यम मुदत कर्ज घेतले. समितीचे बनावट पत्र तयार करून संस्थेस सादर केले. गट नं.51 च्या 7/12 सदरी फेरफार क्र.4004 नुसार इकरारला नोंद लागली.

या सर्व प्रकाराची माहिती दादा दगडू घुले यांना कळताच त्यांनी लेखी स्वरूपात भूदान समिती व कर्ज पुरवठा करणार्‍या संस्थेस कळविले असता, वरील लोकांनी त्वरीत कर्ज व्याजासहीत भरले. समितीला आपण केलेली चूक मान्य करून, या लोकांनी तयार केलेली समिती बोगस असल्याचे लेखी पत्र बारामतीचे उपविभागीय अधिकारी यांना कळविले. वरील लोकांवर योग्य ती फौजदारी कारवाई करू असे सांगितले मात्र, आज तगायत हे सर्व कागदावरच राहिले व वरील लोकांना पाठीशी घालण्याचे काम होत गेले व होत आहे.

महाराष्ट्र ग्रामदान नवनिर्माण समिती (भूदान यत्र समिती) पुणे या नावाची समिती बनावट आहे. या समितीवर फसवणूकी अंतर्गत दि.19 ऑगस्ट 2021 रोजी रायगड जिल्ह्यात एफआयआर नं.0211 नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. ही समिती अस्तीत्वात नसलेचा धर्मादाय आयुक्त पुणे यांनी माहिती अधिकार अंतर्गत दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट सांगितले आहे.

विशेष बाब म्हणजे या प्रकरणात वापरलेले शिक्के, धर्मादाय आयुक्त यांच्याकडील नोंदणी क्रमांक यामध्ये खूप मोठी तफावत आहे. यामुळे ही समिती बोगस आहे हे सिद्ध होते. याबाबत बारामतीचे तहसिलदार यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

संस्थेने ज्यावेळी पीककर्ज दिले तेव्हा संपूर्ण क्षेत्रांपैकी फक्त 12 एकर वहिती होती. 3 एकरात ऊसपीक होते. सर्व क्षेत्रावर ऊसपीक दाखवून कर्ज घेतले ते आजही थकीत आहे. प्रत्यक्षात ज्या 3 एकरावर ऊस होते तो ऊस त्रयस्थ इसमाच्या नावावर कारखान्यास गाळपास दिलेला आहे. या क्षेत्रापैकी 20 ते 22 एकर क्षेत्र पीक घेण्या योग्य नसून, खडकाळ ओबड-धोबड क्षेत्र आहे. संस्थेने या सर्व क्षेत्रावर ऊसपीक कर्ज दिले कसे हे यापूर्वी सहा.निबंधक श्री.कुंभार यांना कोकरे यांनी लेखी स्वरूपात कळविले होते. मात्र त्यांनी ठोस कारवाई न करता संस्थेस कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देवून स्वत:च्या खांद्यावरील बोजा दुसर्‍याच्या खांद्यावर टाकून जबाबदारी टाळली. संस्थेने हे सर्व प्रकरण सहकार न्यायालयात दाखल केले. सभासद व संस्थेचे संचालक, चेअरमन व सचिव हे एकमेकांचे नातेवाईक, हितसंबंध असल्याचेही श्री.कोकरे यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे.

भूदान समितीचे कार्यमंत्री बाळासाहेब लबडे, केशव आनंदराव कोकरे व इतर 8, संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, सचिव, ऊसपीक नोंदणीचे खोटे बनावट दाखले देणारे कारखान्याचे अधिकारी, पुणे जिल्हा मध्य.बँक शाखा निरावागजचे बँक अधिकारी श्री.माने व पीककर्ज वाटप शेतकी अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाची फसवणूकीचे गुन्हे दाखल करावे अशीही मागणी केली आहे. सोबत सर्व पुरावे जोडलेले आहेत. सहा.निबंधक सहकारी संस्थेचे श्री.टांकसाळे यांनी कारवाई न केल्यास प्राणांतिक उपोषण करणार असल्याचे विजय कोकरे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!