बारामती(वार्ताहर): जोपर्यंत तुमच्या मनावरची गुलामगिरी दूर होणार नाही, तोपर्यंत कितीही स्वातंत्र्य मिळाले तरी फायदा नाही असे प्रतिपादन बारामती येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांनी केले.
मा.सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय संविधानाबाबत जनजागृती या विषयावर श्री.भालेराव बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका विधी सेवा समिती व बारामती वकील संघटना यांच्या संयक्त विद्यमानाने सिद्धार्थनगर बुद्ध विहारात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकटे, माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, नगरसेविका सौ.निता चव्हाण, सौ.अनिता जगताप, सौ.मयुरी शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.भालेराव म्हणाले की, राज्यघटनेत कलम 14 ते 25 पर्यंत धर्मस्वातंत्र्याबाबत सांगितलेले आहे त्यामुळे सरकारने एकमेकांमध्ये भेदभाव करू नये. राज्यघटनेचा आत्मा म्हटले तर कलम 32 व 21 आहे. या अधिकाराचे हनन झाले नाही पाहिजे. स्वातंत्र्यता नसेल तर मिळणारे राजकीय स्वातंत्र सुद्धा उपभोगता येत नाही. ग्रीकमधील उदाहरण देताना त्यांनी सांगितले की सत्ता मिळवूनही त्यांना सत्ता उपभोगता आली नाही कारण त्यांचे मन स्वातंत्र्य नव्हते, मनावर गुलामगिरी होती. एखाद्या रूग्णाला जगण्याची इच्छाच नसेल तर त्या रूग्णावर औषधे, तज्ञ डॉक्टरांनी उपचार केला तरी काहीही फरक पडत नाही. कारण त्याचे मन जर जगण्याला अर्थ नाही असे म्हणत असते असेही ते म्हणाले.
कायद्यानुसार आपल्याला स्वातंत्र मिळाले. मात्र मनावरचे स्वातंत्र्य आपल्याला उपभोगता येते का? हा विचार करणे गरजेचे आहे. स्वत:चे मन आपण गुलाम करतो, हेच मन व्यसनातून मुक्त झाले आहे का? गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मग तो बंड करून उठेल. मात्र ती गुलामी कोणती, स्वातंत्र्य म्हणतो ते स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय हे लक्षात घेणे गरजेचे आहे. माणसाचे शरीर तुरूंगात किंवा पिंजर्यात डांबून ठेवलेले त्यास मुक्त करणे सोपे आहे. त्यांचे मन तुरूंगातच राहत असते. साखळदंड काढले जातात मन परिवर्तन केले जाते, पण गुलामी जात नाही.
शिवरायांचे राज्य व आदर्श डोळ्यासमोर असल्याने राज्यघटना बनविताना त्रास झाला नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. आज आपण अंध:श्रद्धा, अध्यात्मक व व्यसनाामध्ये अडकलो आहोत त्यामुळे आपले अंध:पतन होत आहे. डॉ.बाबासाहेबांना पत्रकारांनी विचारले होते अनेक माणसांमध्ये बसलेला तुमचा अनुयायी कसा ओळखावा त्यावर बाबासाहेबांनी सांगितले ज्याचे चारित्र्य निष्कलंक असेल तो माझा अनुयायी असेल. सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना व्यसन करू नये, घरात व्यसन करीत असताल तर घरातील व्यक्तींना त्रास होऊ नये असे करा असेही ते म्हणाले.
थॉमस स्पेन नावाच्या लेखकाने लिहिलेले पुस्तक वाचून महात्मा फुले घडले. जीवनात पुस्तक किती महत्वाचे आहे हे त्यांनी सांगितले. महात्मा फुलेंच्या वडिलांना समजावून शाळेत पाठविण्यास सांगणारे मुस्लीम शिक्षक होते. क्रांती होत असते, ज्याप्रमाणे भारतीय संविधनाने झाली. कोणत्याही क्रांतीला पार्श्र्वभूमी लागते. चंद्रगुप्त, भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महान संत व डॉ.बाबासाहेबांनी क्रांती घडवून आणली. सर्वांवर अन्याय होत असतो, अन्याय करणारे प्रत्येक जण अन्यायग्रस्त आहे, गुलाम आहेत. त्यामध्ये सुद्धा वर्गवारी आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये वर्गवारी असते. या वर्गवारीमुळे माझ्यावर अन्याय झाला म्हणून एकमेकांमध्ये आपण द्वेष निर्माण करीत बसत नाही. त्यासाठी विविधतेचे संवर्धन केले पाहिजे.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या वेगवेगळ्या नाहीत आणि या वेगळ्या टिकू शकत नाही. समता जन्मता असते. विषमता मुलभूत आहे जन्माने कोणीही श्रेष्ठ ठरत नाही तो कर्माने ठरतो. त्यामुळे कनिष्ठाला वरिष्ठ होता यायला पाहिजे. वरिष्ठ आपल्या कर्माने कनिष्ठ होत असतात.
आपण सर्व भारतीय आहोत मात्र खर्या अर्थाने आजही आपण आपल्या हृदयावर, मनावर व प्रेमावर बिंबवले नाही. नाहीतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्याची वेळ आली नसती. आजही काही मंडळी माझा श्रेष्ठ समाज, गट असे वावरत असतात. आपण एकमेकांचे बांधव आहोत बहिणभाऊ आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कास्ट इन इंडिया या पुस्तकात भारतातील जाती, जातीचे उच्चाटन पहिल्या पानावर परिच्छेद पाच मध्ये चार जमातीमध्ये वाटले गेले आहे. ही जमात एकेकांमध्ये भांडले, रक्तपात केला पुन्हा एकत्र आले. एकमेकांमध्ये विवाह होत गेले आणि आपण सर्व यांचे वंशज आहोत हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. आजही कोणाला याबाबत शंका असेल तर त्यांनी आपला डीएनए चाचणी करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक समता नसेल तर बंधूता प्रस्थापीत करता येणार नाही. बंधूता नसेल तोपर्यंत अखंड भारत बनणार नाही. अमेरिकेत बाहेरून आलेले आदीवासी आहेत. अनेक राज्यामध्ये विभागलेली होती. मात्र, एकामागून एक राज्य जोडत गेली आणि अमेरिका एकसंघ होऊन आज मोठे राष्ट्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. भारतात अनेकता एकत्र आली तर भारत ही एकसंघ होण्यास वेळ लागणार नाही. असेही ते म्हणाले.
राज्यघटना एका समुहाला किंवा एका राज्याला लक्षात घेऊन बनविलेली नाही. सविस्तर, समजुतीने पैलू बनिवले आहेत. देशाची व्यवस्था विविधतेने राज्यघटना बनली असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यघटने 21ए शिक्षणाचा अधिकार दिला आहे. तो आजही शंभर टक्के पूर्ण झाला आहे का? असाही प्रश्र्न त्यांनी उपस्थित केला. भूतकाळातील अंध:काराला दोष न देता मेनबत्ती पेटवून अंध:कार दूर करा, ज्ञानाची ज्योत पेटवत रहा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपण सर्व एकत्र आलो, समानता दाखविली त्याबद्दल कौतुक करीत त्यांनी ङ्कएकही सबमें खडे हुए मोहम्मद-ओ-आयाज, ना कोणी बंदा रहा ना बंदानवाजङ्ख ही शायरी सांगून त्यांनी मनोगताचा शेवट केला.
यावेळी कैलास चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकटे यांनी केले. सुत्रसंचालन सौ.चव्हाण यांनी केले तर शेवटी आभार ऍड.सुशिल अहिवळे यांनी मानले.