अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): केंद्र व राज्य सरकार उद्योगपतींची करोडो रूपांची वीजबिले माफ करीत आहेत. मात्र शेतकर्यांना अवाजवी बिले देवून सक्तीची वसुली केली जात असल्याची प्रतिक्रीया भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने वीजबिल जलाव आंदोलन सुरू आहे. निमगांव केतकी, गोतंडी व इंदापूर नगरपरिषदेसमोर वीजबिल जलाव आंदोलनाप्रसंगी श्री.शिंदे बोलत होते.
याप्रसंगी इंदापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब भोंग, शहराध्यक्ष वसीम शेख, सुरज धाईंजे, संजय कांबळे, पप्पू पवार, राहुल शिंगाडे उपस्थित होते. निमगांव केतकी व गोतंडी याठिकाणी बाबासाहेब भोंग यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी गोतंडीचे अनिल खराडे, सुनिल कांबळे, शोभना कांबळे, रवी कांबळे, आप्पा पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, केंद्रात व राज्यात सरकार कोणतेही असो शेतकर्यांना न्याय देण्याचे कोणीही काम करीत नाही. इतर ग्राहकांना अठरा तास वापरलेल्या वीजेची बिले वसुल तर शेतकर्यांना फक्त आठ तास मिळणार्या वीजेची अवाजवी बिले व सक्तीची वसुली सुरू आहे. अशा पिळवणूकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. उद्योगपतींसाठी बजेट केले जाते हमीभाव ठरविला जातो. मात्र, शेतकरी रात्रं-दिवस करून पिकवीत असलेल्या त्याच्या मालाला हमीभाव तर दूरच बाजारात विक्रीस आणलेल्या मालाचा भाव तो व्यापार, दलाल ठरवतो साधे त्या शेतकर्याला विचारीत सुद्धा नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.

लॉकडाऊनच्या काळात अंदाजे बिले दिली गेली. शेतकरी, हातावरचे पोट असणारे, कष्टकरी व कामगारांना हाताला काम नसल्याने घरी होते. अवाजवी वीजबिले आल्याने तो आर्थिक संकटात सापडला आणि आज त्यास अंधारात बसविण्याचे काम या सरकारने केले आहे. याबाबत निर्णय न झाल्यास 20 नोव्हेंबरला जेल भरो आंदोलन करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
इंदापूरमधील निमगाव केतकी, गोतंडी ठिकाणी जुलमी आणि तालीबानी विचारांच्या सरकारचा निषेध म्हणून वीजबिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले. वीजबिलांची वसुलीसाठी दहशत सुरू आहे. यांच्या जाचाला कंटाळला आहे. शेतकर्यांचे शेतातील पीक हाता तोंडाला आलेले असताना महावितरण कंपनीचा लाईनमन येऊन ट्रान्स्फार्मर बंद करत आहे.