अनेकान्त स्कूलमध्ये विद्यार्थी व पालकांची फी संदर्भात पिळवणूक : माई फाऊंडेशनचे ऍड.वैभव काळे यांनी केली गटशिक्षणाधिकारी यांचेकडे तक्रार

बारामती(वार्ताहर): अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अनेकान्त इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी व पालकांची फी संदर्भात पिळवणूक होत असलेबाबतची तक्रार माई फाऊंडेशनचे ऍड.वैभव काळे यांनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना लेखी स्वरूपात केली आहे.

याबाबत दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, सदर संस्थेने विद्यार्थ्यांनी शैक्षणिक फी भरली नाही म्हणून ऑनलाईन शिक्षण बंद केले. ऑनलाईन परीक्षेचा निकाल दिला नाही. याबाबत पालकांनी शालेय प्रशासन व कर्मचार्‍यांशी बोलणी केली असता तुम्ही आत्ताच्या आत्ता फी भरा आम्ही लगेच ऑनलाईन ऍप चालु करून देऊ असे सांगण्यात आले.

सर्वच पालक पाल्याच्या शिक्षणाबाबत संवेदनशिल आहेत. पालकांनी शालेय प्रशासनाशी फोनवर बोलणी केली असता अरेरावीची भाषा वापरतात व फी भरायची लायकी नसेल तर कशाला आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतले आहे असे उध्दटपणे व अपमानजनक बोलत असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

अनेकान्त एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेकडून शासनाचे नियमांचे उल्लंघन करून फक्त फी वसुलीसाठी पालकांना वेठीस धरून एक प्रकारे दहशत, दमदाटी व अरेरावी केली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली आहे.

स्कूलने शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली….
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक: शाशैशु-2021/प्र.क्र.47/21/एसएम-6 दि. 12ऑगस्ट 2021 मध्ये पान नं. 5 मुद्दा क्र.4 मध्ये कोव्हीड-19 महामारीच्या काळात विद्यार्थ्याने शाळेची फी, थकीत फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापन अशा कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेण्यास किंवा परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात येऊ नये किंवा अशा विद्यार्थ्यांचा निकाल देखील रोखून धरण्यात येवू नये असे स्पष्ट आदेश असताना या स्कूलने शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली असल्याचे बारामतीत चर्चेचा विषय बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!