मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने महिला तक्रार निवारण समिती पुनर्गठीत केली असून समितीच्या अध्यक्षपदी वरिष्ठ स्वीय सहायक श्रीमती शु.म.घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 मधील तरतूदी व शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग दि.19 जून 2014 मधील सूचनांच्या अनुषंगाने गृहविभागकरीता गठीत करण्यात आलेल्या समितीचा कार्यकाल पूर्ण झाल्याने महिलांच्या लैंगिक सतावणूकीस प्रतिबंध करण्यासाठी व अशा सतावणुकीशी संबंधीत तक्रारीचे/समस्यांचे निवारण तसेच तपासणी करण्यासाठी समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे.
या समितीचे सदस्य अवर सचिव ग.मो.काथवटे, कक्ष अधिकारी श्रीमती सी.तु.सावंत, सहायक कक्ष अधिकारी श्रीमती छा.न.माळी, अशासकीय सदस्य उच्च न्यायालय मुंबईचे ऍड. श्रीमती मानकुंवर मिलिंद देशमुख, सचिव म्हणून अवर सचिव/कक्ष अधिकारी (आस्थापना-2) या सदस्यांची नियुक्ती 9 नोव्हेंबर 2021 पासून तीन वर्षासाठी करण्यात आलेली आहे.
या समितीने अधिनियमाच्या तरतुदीनुसार महिलांच्या लैंगिक छळवणूकीस आळा घालण्यासाठी व कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे याकरीता आवश्यक उपाययोजना करणे. समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे विहित कालावधीत निवारण करणे व तक्रारींच्या अनुषंगाने योग्य त्या प्राधिकार्याकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करणे. वार्षिक अहवाल सादर करणे अशी सदस्यांची कार्यकक्षा व कर्तव्य आहेत.