बारामती(वार्ताहर): शहरातील परमीट रूम बियर बारमध्ये सर्रासपणे महाराष्ट्र शासनाचा कर बुडवीत ट्रेडचा माल न घेता वाईनशॉपमधून माल घेऊन विक्री केला जात आहे. याकडे उत्पादन शुल्क अधिकार्यांचे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राज्याचे उपमुख्यमंत्री यांना लेखी स्वरूपात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.
राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्यार्कयुक्त/अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो. तसेच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागमार्फत केले जाते. सदरचा उद्देश हा मद्यार्कयुक्त पदार्थांची निर्मिती/वाहतुक/विक्री/बाळगणे/आयात/निर्यात इ. साठी विविध अनुज्ञप्ती/परवाने मंजुर करुन साध्य करण्यात येते. तसेच गुन्हा अन्वेषण करून सक्त अंमलबजावणी व दक्षता राखली जाते. एवढं काम असताना राज्याचे उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री ना.अजित पवार यांच्या बारामतीत मात्र, सर्रासपणे शासनाचा कर बुडवीत वाईनशॉप मधून माल घेऊन परमीट रूममध्ये विक्री केला जात आहे. परमीट रूम धारकांनी ट्रेडचा माल उचलून विक्री करणे क्रमप्राप्त असताना ते सर्रासपणे वाईनशॉपमधून माल घेऊन विक्री करीत असल्याने शासनाचा कर बुडविला जात आहे.
या सर्व प्रकारावर बारामती विभागावर नियंत्रण ठेवणार्या अधिकार्यांचे दुर्लक्ष दिसत आहे. दर महिन्याला हजाराच्या पटीत पैसे घेऊन जातात अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप अशी अवस्था होऊन बसली आहे.
बारामती शहरात अंदाजे 80 ते 90 बारची नोंद असेल तर संपूर्ण तालुक्यात अंदाजे 300 च्या पटीत बार असतील. शासनाचा कर बुडविणार्या व कर बुडविण्यास साथ देणार्या अधिकार्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
या विषयावर उत्पादन शुल्क बारामतीचे अधिकारी मनाले साहेब यांना संपर्क केला असता, आम्ही सतत अशा गोष्टींवर लक्ष देवून आहोत, असे काही निदर्शनास आल्यावर तातडीने कारवाई करीत आहोत.
बारामतीचे उत्पादन शुल्क ऑफीस सवासनीच्या कुंकवा प्रमाणे आहे. हे कार्यालय कधी उघडे असते तर कधी बंद, अधिकारी, कर्मचार्यांचे वेळापत्रक नाही. बारामतीत नावाला हे उत्पादन शुल्क विभाग कार्यालय आहे.