अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): बहुजन मुक्ती पार्टीवर नागरीकांचा विश्र्वास व त्या विश्र्वासावर विकास कामांवर करडी नजर ठेवून दर्जेदार कामे करून घेतली व वेळप्रसंगी अडीअडचणी सोडविण्यासाठी आंदोलने केली असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल मखरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
या वेळी बहुजन मुक्ती पार्टीचे बाळासाहेब भोंग, संजय (डोनाल्ड) शिंदे, संतोष क्षिरसागर,सुरज धाईंजे, वसीम शेख, प्रकाश पवार सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे मखरे म्हणाले की, नागरीकांच्या विश्र्वासावर येऊ घातलेल्या इंदापूर नगरपालिकेच्या निवडणूकीत सर्व जागा लढविण्याचा विचार करणार आहे. या निवडणूकीत किमान पाच ते सहा नगरसेवक निवडून जाणारच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नगरपालिकेचा स्वच्छ कारभार, कमिशन मुक्त कामे, स्वच्छ इंदापूर, विकास कामांना प्राधान्य देण्याचे विषय व मुद्दे घेऊन निवडणूकीत उतरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विचारधारेबाबत बोलताना म्हणाले की, दोन मते कमी पडली तरी चालेल पण आमची जी विचारधारा आहे ती कदापिही सोडणार नाही.
सध्या आमच्याकडे सत्ता नाही परंतु आमच्याकडे सत्ता आल्यास मी व निवडून येणारे सर्वांचे प्रश्र्न सोडविल्याशिवाय राहणार नाही असाही शब्द त्यांनी यावेळी दिला.