शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमातून 300 विद्यार्थ्यांना झाली मदत व 10 विद्यार्थ्यांची वार्षिक फी भरली जाणार

बारामती(वार्ताहर): विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे व ज्यांना शिक्षणाचे महत्व कळत नाही त्यांच्यासाठी सक्तीचा कायदा असावा या उद्देशाने बारामती शहरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते, भास्कर दामोदरे, सुमित साबळे व अभिलाश बनसोडे यांच्या वतीने घेण्यात आला होता.

सदरचा कार्यक्रम 24 ऑक्टोबर 2021 रोजी सायं. 6 वा. परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बारामती याठिकाणी घेण्यात आला होता.

वह्या, पुस्तके, पॅड, कंपास पेटी, शार्पनर, पेन्सिल, खोडरबर, चित्रकला वह्या इ. शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या. शिक्षणाची गोडी, आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळा सुरू होणार मात्र गरीब, गरजु विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्र्न मनात भेडसावत होता. मोहिते, दामोदरे, साबळे व बनसोडे या युवकांनी परिसरात जावून विद्यार्थ्यांचा आढावा घेतला. कोरोना काळात हातावरचे पोट असणार्‍यांची आर्थिक परिस्थिती रसातळाला गेलेली आहे. एकवेळचे जेवण मिळणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण देणे जिकीरीचे झाले आहे.

या चौघांनी स्वत:च्या सामर्थ्यावर साहित्य जमा केले मात्र, शैक्षणिक भूख जास्त जाणवत होती. मित्र परिवाराला मदतीचा हात मागितला लोकवर्गणीतून साहित्य जमा केले. या उपक्रमातून 300 विद्यार्थ्यांना मदत झाली असून, ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा कुटुंबातील 10 विद्यार्थ्यांची वार्षिक फी भरली जाणार आहे. साहित्य वाटपानंतर या लहान-मोठया विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील आनंद गगनभरारी घेत होता.

अनिकेत मोहिते, भास्कर दामोदरे, सुमित साबळे व अभिलाश बनसोडे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

ज्ञानाअभावी व्यक्ती ्‌आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्यक्ती वा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणे होय असेही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिकदृष्ट्यज्ञा मोलाचे विचार मांडलेले आहेत.

यावेळी राजकीय, शासकीय, सामाजिक, शैक्षणिक, विधी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे छायाचित्र देवून सर्वांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!