कोरोना आजार झालेल्यांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती : राज्य शासनाने जाहीर केली मार्गदर्शक सूचना

बारामती(वार्ताहर): दिपावलीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा. असे राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनामध्ये म्हटले आहे.

यावर्षी दि.2 ते 6 नोव्हेंबर, 2021 दरम्यान दिपावली उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्व धर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करताना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन वेळोवेळी व ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी. कपडे/फटाके/दागदागिने व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यांवर गर्दी होत असते. तथापि, नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.

सार्वजनिक आरोग्य विभाग आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करतांना सदर मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या रिट पिटीशनमधील आदेशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असे गृहविभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!