निवडणूका कोणत्याही असो, विविध पक्ष, पक्षातील कार्यकर्ते, संस्थांवर काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते विशेषत: सामाजिक कार्यकर्ते यांचे लक्ष केंद्रीत करते. बारामती नगरपरिषदेची पंचावार्षिक निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. ज्यांच्याकडे आहे माल, त्यांचा सुटला राव ताल! अशी परिस्थिती काही प्रभागात दिसत आहे. लोकसभा, विधानसभा या निवडणूका पाहिल्या तर उमेदवार करीत असलेल्या विकास कामांवर आधारीत असते. संबंधित जिल्हा व तालुक्याचा झालेल्या विकासावरून मतदार डोळे झाकून निसंकोच त्या उमेदवाराला भरभरून मते देतात निवडून आणतात हे आपण सर्वजण पाहत आलेलो आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत मात्र तसे होताना दिसत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे. तुम्ही तुमच्या प्रभागात किंवा वार्डात कितीही विकास केला किंवा मतदारांच्या अडी-अडचणी, सुख-दु:खात सहभागी झाला तरी शेवटच्या रात्री त्या उमेदवाराच्या विरोधात असणारा उमेदवार सर्व मते फिरवतो आणि शेवटी विकासाला लाथ आणि आर्थिक विकासाला साथ असे मतदार करीत आलेले आहेत. ही सवय कोणी लावली याचा विकासात्मक दृष्टीकोन ठेवणार्यांनी चिंतन करण्याची गरज आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत निवडून गेलेले काही नगरसेवक आपल्या प्रभागात पाऊल सुद्धा ठेवला नाही किंवा नगरपरिषदेत होत असलेल्या घडामोडीत सहभाग घेतला नाही. त्यांच्या मते मोजकी तीन चार मंडळी नगरपालिका चालवते आपण फक्त बुजगावणे आहोत. नगरपरिषदेच्या प्रत्येक घडामोडीत काहींना समाविष्ठ करून घेतले जात नाही. माहिती दिली जात नाही त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून का म्हणून पुढे..पुढे करायचे असाही सवाल पडतो.
बारामती नगरपरिषदेच्या येणार्या निवडणूकीत काहींच्या मते वेगळे चित्र दिसेल. आम्ही ठाम राहणार आहोत. यावेळी आमचा समाज जागृत झालेला आहे. कितीही पक्षाने ताकद लावली तरी आम्ही बदलणार नाही. आमचा स्वाभिमान गहाण ठेवणार नाही इ. सारख्या गोष्टी बोलून दाखविण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, जो बोलतो त्याच्या घरात जर उमेदवारी दिली आणि लाग कामाला असे म्हटले तर त्याने काय करायचे. मोठ-मोठ्या केलेल्या गोष्टी गाठोडे बांधून वरच्या माळ्यात ठेवायच्या का? किंवा मला नको उमेदवारी म्हणण्याची धमक तुमच्यात निर्माण होईल का? असाही प्रश्र्न आहे.
त्यामुळे कोणीही काही म्हणा, निवडणूकीच्या रात्रीत सर्व मतदार आपला स्वाभिमान, अभिमान, तत्वे बाजुला ठेवून मतदान केंद्रावर जोर दाखवीत शेवटी रात्रीत तळहातावर मिळालेल्या प्रसादाची शपथ घेत डोळे झाकून सांगितलेलेच बटण दाबतो असे का? त्यामुळे प्रथमत: स्वत:ची मानसिकता बदला, आपले ध्येय निश्र्चीत करा आणि निवडणूकीच्या मैदानात उतरा. कित्येक उमेदवार स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करतात मतदारांच्या भावनांशी खेळतात ऐनवेळी माघार घेतात आणि या माघारीतून काहीतरी साध्य झालेले असते हे कुण्या ज्योतिष्याने सांगण्याची गरज नाही.