ऍड.सीमा लोंढे यांच्या युक्तीवादामुळे ट्रस्टला मिळाला न्याय
बारामती(वार्ताहर): राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार संपादीत जमिनीच्या नुकसान भरपाई रकमेबाबत वाद निर्माण झाल्यास तो वाद भूसंपादन अधिकारी यांनी न हाताळला तो न्यायालयात पाठविण्याचा असतो मात्र, बारामतीचे भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी कूळांना नुकसान भरपाई देवून कायदे व नियमांची पायमल्ली केल्याचे मे.कोर्टाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाटस (ता.दौंड) येथील श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्टची मिळकत नं.138 आहे. या मिळकतीपैकी 1हे.36 आर क्षेत्र संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाकरीता संपादीत झालेली आहे.
या क्षेत्राबाबत बनावट कूळ बापुसो माने व इतरांना या ट्रस्टच्या नुकसान भरपाईची रक्कमेची केलेल्या मागणीला ट्रस्टचे विश्र्वस्त योगेश विजय देशपांडे यांनी वेळोवेळी उपविभागीय अधिकारी, बारामती यांचेकडे हरकत घेतली होती. मात्र तरीही उपविभागीय अधिकारी यांनी बनावट कूळ माने यांना सदरची रक्कम चुकीच्या पद्धतीने अदा केली.
या चुकीच्या निर्णया विरोधात ट्रस्टचे देशपांडे यांनी बारामती येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांचेकडे देखील दावा दाखल केलेला आहे. या दाव्यावर निर्णय देताना मे.कोर्टाने सदर चुकीच्या पद्धतीने वाटप केलेल्या रकमेबाबत आश्चर्य व्यक्त केले. ज्या बँक खात्यांमध्ये सदर रक्कम जमा करण्यात आलेल्या आहेत ती सर्व बँक खाती गोठवण्याचे (ऋीशशू)आदेश दिलेले आहेत. उपविभागीय अधिकारी यांनी कायदेशीर तरतुदी विचारात न घेता सदर रक्कम अदा करून मनमानी कारभार केला असल्याबाबत आदेशामध्ये नमूद केले आहे.
देवस्थान जमिनींना सरकारचे संरक्षण आहे. या जमिनींचे हस्तांतरणास संपूर्ण बंदी असताना उपविभागीय अधिकारी यांनी कायदा व नियमांची पायमल्ली करीत बेकायदेशीरपणे रक्कम कुळांना अदा केली कशी? याबाबत प्रश्र्न उपस्थित होत आहे.
श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्ट यांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास देवस्थानच्या वतीने बाजु मांडणार्या ऍड.सौ.सीमा लोंढे-मोने यांनी व्यक्त केला आहे.