गेल्या सहा दिवसांपासून पवार कुटुंबीयांपैकी काहींच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी देखील सलग 5 ते 6 दिवस छापे टाकण्यात आले. यावरून केंद्रीय यंत्रणांचा केंद्र सरकार राजकीय फायद्यासाठी गैरवापर करत असल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.
आयकर विभागाच्या छाप्यांसंदर्भात सांगितले की, मी राज्याचा अर्थमंत्री आहे. सरकारचे रिसोर्सेस महत्त्वाचे असतात. त्याची रिकव्हरी करण्यासाठी केंद्राने काही भूमिका घेतली तर मी त्याला विरोध करणार नाही ही माझीही अर्थमंत्री म्हणून जबाबदारी आहे. वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी बोलेन. पण ही चौकशी थांबल्यानंतर बोलेन असं अजित पवार म्हणाले. पण ती चौकशी अजून सुरू आहे.
छापा टाकण्यासाठी आलेल्या आयकर विभागाच्या पथकाला पुढचे आदेश येईपर्यंत घर न सोडण्यास बजावण्यात आले आहे. तिन्ही मुलींचा कारखाना नाही. एक पब्लिकेशनमध्ये आहे, एक डॉक्टर आहे आणि तिसरी गृहिणी आहे. आयकर विभागाची लोकं तिथे गेली चौकशी करायची होती ती केली. एक-दीड दिवसाची चौकशी संपली. ते बिचारे काम संपल्यानंतर त्यांना जायची घाई होती. पण त्यांना सारखे फोन येत होते की थांबा, इतक्यात सोडू नका. नंतर त्यांना आमच्या मुलींनीच विचारलं की तुमचे घरचे वाट बघत असतील. तेव्हा ते म्हणाले की आम्हाला निर्देश आहेत की सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही. त्यामुळे 5 दिवस झाल्यानंतर देखील काही ठिकाणी अजून पाहुणे आहेत. आत्तापर्यंत अशा चौकशा झाल्या आहेत. पण 5-6 दिवस एखाद्याच्या घरात जाऊन चौकशी केल्याचं ऐकिवात नाही. योग्यवेळी त्याबाबत विचार करता येईल. कोल्हापूरला मुलीकडे मी चौकशी केली. तिथे काही जास्त लोक घरी राहात नव्हते. त्यांच्याकडे नवरा-बायको राहतात. त्यांच्या घरी 18 लोकं गेले. जे कधी पाहिलं नव्हतं, ते घडलेलं आहे, असं पवारांनी यावेळी नमूद केलं.
दरम्यान, राज्यातील सरकार अस्थिर करण्याचं धोरण केंद्रातील भाजपा सरकारने ठेवल्याचा आरोप पवारांनी यावेळी केला. सत्तेचा गैरवापर फक्त राष्ट्रवादीविरोधात नाही. टार्गेट तिन्ही सत्ताधारी पक्षांना केलेलं दिसतं. त्यात मुख्य घटकाऐवजी त्याच्या जवळच्या लोकांवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतं. साधारणपणे धोरण असं दिसतंय की दिल्लीच्या सत्ताधारी पक्षाने राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न 2 वर्ष केल्यानंतरही काही होऊ शकत नाही, हे दिसल्यानंतर आता हा मार्ग स्वीकारला. यात थेट हल्ला करण्याऐवजी शासनात बसलेल्या लोकांच्या जवळच्या लोकांना या प्रकारे भिती दाखवणे असं धोरण अवलंबलेलं दिसतंय. अशा गोष्टी फार घडल्या आहेत. त्याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही, असं देखील पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.