दादांच्या नावावर, सावलीवर व आशीवार्दावर आर्थिक गडगंज झालेली मंडळी निषेधावेळी कुठे होती?
बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या समर्थनाथ व आयकर विभाग (एन.सी.बी.) आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी झालेल्या गर्दीपेक्षा दहिहंडी उत्साहात एका चौकात होणारी गर्दी जास्त असते. मात्र, दादांच्या नावावर, सावलीवर व आशीवार्दावर आर्थिक गडगंज झालेली मंडळी निषेधावेळी कुठे होती असा खोचक सवाल सर्वसामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता व बारामतीकरांना पडलेला आहे.
दादांच्या समर्थनाथ निषेध करण्यासाठी जर बारामतीच्या नागरीकांना आवाहन केले असते तर प्रत्येक घरातून किंवा बारामतीकरांसाठी केलेल्या विकासात्मक कामचा आदर करीत ते तरी बहुसंख्येने उपस्थित राहिले असते. आजही पक्षाचा आदेश डावलण्याचे कृत्य काही मंडळी सर्रासपणे करीत असतात हे या निषेधावरून पुढे आले आहे.
ज्याप्रमाणे अजितदादा यांचेवर बारामतीकर निवडणूकीत भरभरून प्रेम करतात त्या पटीत किंवा त्यापेक्षा जास्त बारामती व बारामतीच्या आसपासचा विकासात्मक दृष्टीकोन दादा ठेवत आलेले आहेत. बारामतीत होत असलेल्या विकासाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. याचा गर्व बारामतीकरांना आहे व राहणार हे ही तेवढे सत्य आहे. दादांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणून प्रत्येक ठिकाणचा विकास केला आहे.
या विकास कामांच्या जोरावर बढाई मारणारे कुठे होते. यामध्ये नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, छत्रपती- माळेगाव व सोमेश्र्वर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, दूध उत्पादक संघ, बँका, पतसंस्था, सोसायट्या, सामाजिक संस्था, मंडळे या सर्वांचे पांढरे कपडे घालून दादांच्या मागे पुढे करणारे पांढरे बंगळे कुठे होते. बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शंभराच्या पटीत किंवा त्याहूनही जास्त उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, संघटक इ. पदे घेतलेल्यांनी जरी याठिकाणी उपस्थिती दर्शविली असती तरी निषेधापूर्वीच भिगवण चौक नव्हे तर कमिटीचा परिसर भरला असता.
‘जवा’ ‘वाघो’-बा पळून जातो तेव्हा….
एका शैक्षणिक संस्थेचा सर्वेसर्वा व स्वत:ला शैक्षणिक संस्थेचा वाघ समजणारा या निषेधासमयी भिगवण चौकातून पाहुन गेला. त्याचे आद्यकर्तव्य होते दादांच्या समर्थनाथ सहभागी होऊन आयकर विभाग व केंद्र सरकारचा निषेध केला पाहिजे. ज्या पवार कुटुंबियांनी वेळोवेळी या शैक्षणिक संस्थेला मान्यता, सरकारचा निधी मिळविण्यासाठी कोणताही दुजाभाव न करता सढळ हाताने मदत केली त्याबाबतची मनात लाज बाळगत तरी थांबले पाहिजे होते. अशा व्यक्ती पाठफिरवून जात असतील तर भविष्यात या शैक्षणिक संस्थेला मदत करणे कितपत योग्य ठरेल. स्वत:चे काम होईपर्यंत बारामतीचा ढाण्या वाघ, कैवारी, आधारस्तंभ म्हणायचे काम झाले की हो लांब म्हणायचे ही प्रवृत्ती समोर येत आहे. जवा वाघोबा पळून जातो तर सर्वसामान्य कार्यकर्ता व बारामतीकरांमध्ये चर्चा होणारच ना?