अशोक घोडके यांजकडून…
गोतंडी(वार्ताहर): विनोदी शैलीतून भाषणातून आपले विचार सर्वांपर्यंत पोहचविणारे इंदापूर तालुक्यातील ग्रामीण राजकारणातील मार्गदर्शक जगन्नाथराव मारूतीराव मोरे उर्फ ज.मा.मोरे यांचे वयाच्या 88 व्या वर्षी बुधवार दि.6 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 6 वाजता निधन झाले.
गेली 46 वर्षापासुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांचे अत्यंत जवळचे विश्वासू, घनिष्ठ मित्र म्हणून त्यांची वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात होती.
1960 ला संयुक्त महाराष्ट्र वेगळा झाल्यानंतर तब्बल 2 वर्षे महाराष्ट्रात कोणत्याही सार्वत्रिक निवडणुका झाल्या नाहीत. नंतर 1962 ला पहिल्या जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये ज.मा.मोरे हे विजयी होऊन इंदापूर पंचायत समितीचे पहिले सभापती झाले. इंदापूर पंचायत समितीच्या स्थापनेच्या सुरुवातीला 1 मे 1962 ते 5 ऑगस्ट 1972 पर्यंत तब्बल दहा वर्ष सभापतीपदी होते. मोरेंनी तीन वेळा इंदापूर विधानसभा निवडणूक लढवली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सक्षमपणे सांभाळली.
त्यांच्या पश्र्चात मुलगा भारत, नातू समीर, सुना, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने इंदापूर तालुक्यासह निमगाव केतकी गावात शोककळा पसरली होती.
पितृतुल्य आदर्श मार्गदर्शकाला मुकलो – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
ज.मा.मोरे उर्फ आप्पांच्या निधनाची बातमी मनाला फार चटका लावणारी असून मी माझ्या आयुष्यातील एक पितृतुल्य आदर्श मार्गदर्शकाला मुकलो असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फेसबुक पोस्ट करीत शोक व्यक्त केला.
इंदापूर तालुका ज्येष्ठ मार्गदर्शकाला हरपला – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्यासमवेत ज. मा.(आप्पा)मोरे यांनी कार्य केले असून तालुक्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव योगदान आहे. इंदापूर पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून त्यांची ओळख होती. तालुक्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांचे कार्य होते. मोरे कुटुंबियांच्या दुःखात पाटील परिवार सहभागी आहे. ज. मा. मोरे यांच्या निधनाने तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.