बारामती नगरपरिषदेची निवडणूकीत हौसे, नवसे व गवसे वार्डात, प्रभागात चमकू लागलेले दिसत आहे. नगरपालिकेत हौस भागविण्यासाठी आलेले हौसी मंडळी, तर काहींनी साखर झोपेत नवस केला होता तो फेडायचा म्हणून नवसे मंडळी आणि काहींना नगरपरिषदेत चिक्कार पैसा आहे, कुठं काय घावतय का? कोणत्या कामात हाता मारता येईल का असे गवसे मंडळी बाशिंग बांधून निवडणूकीच्या रिंगणात तयार आहेत.
या हौसे, नवसे व गवसे लोकांना मला सांगायचे आहे की, कोणत्याही क्षेत्रात उडी मारताना त्याचा अंदाज, कामाची पद्धत इ. अभ्यास करणे गरजेचे आहे. आज कित्येक नगरसेवकांना नगरपरिषद अधिनियम, नगरपालिका कोणत्या खात्या अंतर्गत चालते, कौन्सिलला किती महत्व आहे. केलेल्या ठरावाला आवाहन देता येते का? नगरपरिषदेत असणार्या समित्यांना काय महत्व आहे. आपले हक्क व अधिकार काय आहेत इत्यादीचे ज्ञान अवगत नाही. हाय, कोणाचा तरी आशीर्वाद म्हणून नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था होऊन बसली आहे. मी तर म्हणेण जे नगरसेवकांनी पाच वर्ष नगरसेवकपद व इतर पदांवर काम केले त्यांचा अनुभव घेऊन या क्षेत्रात उडी मारली पाहिजे. नाहीतर सजीव माणसाला निर्जिव वस्तु सारखे नगरपरिषदेत जावून काय फायदा असे म्हटले तर वावगे ठरू नये.
एक नगरसेवक त्यांच्या प्रभागातील ड्रेनेज लाईन तुंबली म्हणून बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना बेंबीच्या देठापासून, हातद्वारे करीत प्रश्र्न मांडत होता. लगेच काम झाले पाहिजे मी त्या प्रभागाचा नगरसेवक आहे, मला अजितदादांनी माझे काम पाहून नगरसेवक केले आहे असे म्हणून थोडं शांत झालेवर संबंधित अधिकार्यांनी नम्रपणे सांगितले साहेब, आपला प्रश्र्न मी ऐकला, अनुभवला व प्रत्यक्षात तुमच्या कृतीतून पाहिला मात्र, हे बांधकाम खाते आहे हा प्रश्र्न आरोग्य विभागाकडे मांडायचा असतो. एवढं त्या नगरसेवकानी केले आणि शेवटी पालथ्या घड्यावर पाणी याप्रमाणे झाले आणि या नगरसेवकाने सॉरी..सॉरी…म्हणून खाली मान घालीत आरोग्य विभागाचा मार्ग धरला.
नगरपरिषदेच्या कामकाजात आजही काही माजी नगरसेवकांचा, नगराध्यक्षांचा उल्लेख केला जातो. ही मंडळी लावली जीभ टाळ्याला असे करीत नव्हते तर एखाद्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करून त्या विषयाबाबत आपले मत प्रकट करीत होते. आज प्रशासन सुद्धा त्यांचे नाव घेतल्याशिवाय राहत नाही. ही मंडळी राजकीय संस्था, राजकीय प्रक्रिया, राजकीय घटकांचा पद्धतशीर व व्यवस्थीत अभ्यास करीत होती. राज्यघटनेचे शिल्पकार यांच्या मते ज्यांच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीत एखादी निर्जिव वस्तु जरी उमेदवार म्हणून उभी केली तरी ती निर्जिव वस्तु कशाच्या जोरावर निवडून येते हे सांगणे म्हणजे गैर ठरेल. त्यामुळे कधी-कधी असेही म्हणावे लागते जिसका पॉकेट गरम, उसको किसीकी नही लगती शरम असे होवून बसले आहे. ज्या व्यक्तीला उमेदवाराला राजकारणातील अ,ब,क,ड पासून सुरूवात झाली अशा लोकांचीच पक्षाला गरज असल्याचे आतापर्यंत झालेल्या निवडणूकांमधून दिसुन येते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ज्ञानी, सुज्ञ व विचारवंत कार्यकर्ते, उमेदवारांची गरज नाही का? राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात एखाद्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकार्यांनी प्रतिक्रीया दिल्यास त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्ते अभ्यासपूर्वक प्रतिक्रीया देताना दिसत नाही असे का? हा ही प्रश्र्न आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पक्षाचे विचार तळागाळात पोहचविणारे बोलके वक्ते नाहीत. मध्यंतरी निवडणूकीच्या काळात बोलके वक्ते घेतले तर काही खासदार झाले तर काही आमदार झाले. त्यामुळे भविष्यात पक्षाला हुशार, विचारवंत, सुज्ञ, ज्ञानी, अभ्यासवृत्ती असणार्या कार्यकर्त्यांची गरज आहे. जर अशा कार्यकर्त्यांना विविध स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी दिल्यास विरोधकांना हजरजबाबी, वेळ प्रसंगी उत्तर देतील व पक्षाची योग्य भूमिका मांडतील हे ही तेवढेच सत्य आहे.
त्यामुळे मला नगरसेवक होऊ द्या..असे म्हणणार्यांनी प्रथमत: पक्षाचा, ज्याठिकाणी निवडून जाणारे त्या ठिकाणचा, तेथील परिसराचा अभ्यास करणे गरजेचे आहे.