बारामती(वार्ताहर): डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यामध्ये दूरसंचारची खूप मोठी भूमिका असताना बारामतीच्या दूरसंचार कार्यालयाच्या खासगी ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे दूरसंचार सलाईवर असल्याचे दिसत आहे.
भारतीय टेलिफोन निगम बारामतीमधील खासगी ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गेल्या दीड वर्षापासून टेलिफोन ग्राहक त्रस्त झाले असल्याच्या लेखी व तोंडी तक्रारी बीएसएनएल बारामतीच्या कार्यालयात लेखी स्वरूपात दिली आहे.
काहींनी तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षापासून टेलिफोन बंद आहेत. संबंधीत खासगी ठेकेदार लक्षपूर्वक काम करीत नाही. यामुळे शेकडो फोन रद्द झालेले आहेत. सेवा मिळत नाही. ग्राहकांना मानसिक,आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत या ठेकेदारास काही एक फरक पडत नाही. अशा बिकट परिस्थितीमुळे ग्राहक या कार्यालयाकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाही ही खूप मोठी खेदाची बाब आहे.
या ठेकेदाराचे बिल ग्राहकांनी भरलेल्या बिलाच्या पैशातून होत असते. सदरचा ठेकेदार फूकट काम करीत नाही. या ठेकेदारावर बीएसएनच्या वरिष्ठांचा अंकुश नसल्याचे बोलले जात आहे. जर बीएसएनएल या भारत सरकारच्या सेवेवर लक्ष दिल्यास व दर्जेदार सेवा-सुविधा दिल्यास इतर सुविधांचा वापर कमी झाल्याशिवाय राहणार नाही.
दूरसंचार क्षेत्रास संजीवनी मिळावी म्हणून केंद्र सरकारने विविध उपाय योजले आहेत. मात्र ते अद्यापतरी कागदावरच आहेत. दूरसंचारची मरणघटिका जवळ आल्यावर तिला वाचविण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे. डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यात दूरसंचारची खूप मोठी भूमिका असताना त्याचा अंत केंद्र सरकार पाहत आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे.