शासकीय मोजणीत निघाले अतिक्रमण, मात्र राजकीय घोडं आडवं येण्याची शक्यता? : न्याय न मिळाल्यास संपूर्ण कुटुंब उपोषण करणार

अशोक घोडके यांजकडून…
गोतंडी(वार्ताहर): स्वत:च्या मालकी हक्काच्या गटात अतिक्रमण होत असल्याने स्वखर्चाने शासकीय मोजणी केली, अतिक्रमण निघाले मात्र, आता राजकीय घोडं आडवं येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने न्याय न मिळाल्यास संपूर्ण कुटुंब तहसिल कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकरी महादेव भगवान जाधव यांनी दिला आहे.

इंदापूर तालुक्यातील मौजे शेळगाव येथील शेतकरी महादेव भगवान जाधव (वय-70) यांची पूर्वीपासून मालकी हक्काच्या शेतजमीन गट नं.452,453 मध्ये अतिक्रमण करून रस्ता बनवण्याचा इतरांचा प्रयत्न असल्याने त्यांनी तहसील कार्यालय इंदापूर येथे आपली तक्रार दिली आहे.

पश्चिमेकडील गट नं. 452 चे सर्व्हे नंबरचा बांध व गट नं.453,454 चे पश्चिमेस रस्ता महादेव भगवान जाधव यांनी शासकीय मोजणीस पैसे भरून दि.27 ऑगस्ट 2021 रोजी शासकीय मोजणीदार यांचेकडून मोजून घेऊन दि.14 सप्टेंबर 2021 रोजी हद्दी कायम केल्या आहेत.

मोजणीमध्ये गटाच्या पश्र्चिम बाजुस अतिक्रमण निश्चित केले असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. मोजणीत अतिक्रमण निघणार हे कळताच अतिक्रमीत केलेली जागा लाटण्याच्या उद्देश ठेवणार्‍यांनी ग्रामपंचायत शेळगांव यांना राजकीयदृष्टया पुढे करून नवीन रस्ता तयार करण्याचे काम व प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले आहे. असे झाल्यास झालेले अतिक्रमण काढणे अडचणीचे होणार आहे.

याबाबत न्याय मिळण्यासाठी जाधव यांनी तहसिलदार यांना याबाबत सखोल चौकशी करून लेखी अर्जाद्वारे न्याय मिळण्याची हाक दिली आहे. झालेले अतिक्रमण काढून मिळावे व ग्रामपंचायत शेळगाव यांनी अतिक्रमीत क्षेत्रात मुरूम टाकून रस्ता करण्याचा प्रयत्न करू नये. जर तसे झाल्यास माझ्यासह सर्व कुटुंबातील व्यक्ती इंदापूर तहसील कार्यालयाबाहेर अमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!