बारामती(वार्ताहर): तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय बारामती व वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दि25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे जिल्हा न्यायाधीश-1 व अति.सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी महाराष्ट्रातील उच्च न्यायालय व खंडपीठे, सर्व जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, इतर न्यायालये व न्यायाधिकरणे येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते.
या लोकअदालतीमध्ये न्यायाधिश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ आपणास मदत करते, कोणत्याही प्रकारची फी भरावी लागत नाही, लोकन्यायालयाच्या निवाड्याविरूद्ध अपिल नाही, कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणार्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते, खटल्यांमध्ये साक्षी-पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात, लोकन्यायालयात निकाली निघणार्या प्रकरणामध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.
मग आता वाट कसली पाहताय, चालून आलेल्या संधीचा त्वरीत लाभ घ्या आणि परिसरातील वादांना पूर्णविराम द्या असेही वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकटे यांनी आवाहन केले आहे.