बारामती(वार्ताहर): नागरिकांशी थेट संवाद साधता यावा तसेच तक्रारींचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनला अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांचे उपस्थितीत तक्रार निवारण दिन घेण्यात आला. या दिनास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
9 सप्टेंबर 2021 रोजी पोलीस अधिक्षक डॉ.अभिनय देशमुख यांच्या आदेशाने बारामती शहर पोलीस स्टेशनला अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली तक्रार निवारण दिन घेणेबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या तक्रार निवारण दिनामध्ये एकुण 103 अर्जाची निर्गती करण्यात आली. यामध्ये एफआयआर (निरंक), एनसी (05), तडजोड (65), निनावी तक्रार (निरंक), दिवाणीबाब (26), प्रतिबंधात्मक कारवाई (निरंक), इतर कार्यालयाशी संबंधित 07 अर्ज पाठवण्यात आले. मुद्देमाल व कागदपत्र हस्तांतर (03) वाहने ताब्यात दिली. एकुण 1 लाख 75 हजार रूपयांचा गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादी व साक्षीदार यांना बोलावून मौल्यवान वस्तुंसह परत करण्यात आला.
अनेकदा नागरिकांकडून येणार्या अर्जावर कार्यवाही करण्यात येत असते. तर, काहीवेळेस यात थोडीफार दिरंगाई होऊ शकते. तक्रारदिनानिमित्त नागरिकांना तक्रारीवर झालेल्या कार्यवाही माहिती दिली जाते. तसेच नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येतात. या दिनामुळे नागरिकांचा पोलीसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलू शकेल असे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले. जास्तीत जास्त अर्ज निर्गती केली असून उर्वरीत अर्जाची निर्गती करण्याची तजविज ठेवली जाईल असेही ते म्हणाले.