कर्ज वसुली करणार्‍यांपासून दिलासा दिल्यामुळे अस्लम शेख यांचा सत्कार

वतन की लकीर (ऑनलाईन): मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे बारामती तालुका अध्यक्ष वस्ताद अस्लम शेख यांनी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे सततचा पाठपुरावा करून बँक, फायनान्स्‌ व पतसंस्थेच्या कर्ज वसुली करणार्‍यांपासून कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरीकांना दिलासा दिल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

पश्र्चिम महाराष्ट्र भिमशक्ती सामाजिक संघटनेचे शरद चितारे, विजय चितारे, संदीप वाघमारे, ऍड.अशोक पाटील, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमीन शेख व कृष्णा जवाळे यांनी वस्ताद अस्लम शेख यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला व त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

प्रशासनातील खरे योद्धे डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी, रूग्णवाहिकेचे चालक, कोरोना मृत्यूची विल्हेवाट लावणारे बा.न.प.चे कर्मचारी, विज वितरण कंपनीचे अधिकारी व फिल्डवर काम करणारे कर्मचारी हे कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी दोन हात करीत लढत आहेत. जीवाची पर्वा न करता नागरीकांची सेवा करीत आहेत. कोरोनाच्या संकटात लहानांपासून ते थोरांपर्यंत, गरीबीपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांनाच आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत. मात्र, यामध्ये हातावरचे पोट असणार्‍यांची खूप बिकट अवस्था झालेली आहे. या लोकांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून गृहपयोगी वस्तु घेतलेल्या आहेत. सततच्या लॉकडाऊन, संचारबंदीमुळे काहींच्या हातचे काम गेले, कोणाला नोकरी गमवावी लागली तर काहींच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाशी लढा देता-देता मृत पावले हे दु:ख कुठे झेलत असताना, कर्ज वसुली करणार्‍यांची अचानक धाड,कर्ज भरण्याचा तगादा इ.मुळे सर्वसामान्य नागरीकांना दुसर्‍या दिवशीचा उगवता सुर्य न पाहिला तर बरं होईल असे मनोमन वाटत आहे.

मात्र, अशातच वस्ताद अस्लम शेख यांनी मानवी हक्क संरक्षण व जागृतीच्या माध्यमातून शासनाचे अधिकारी बारामती उपविभागीय अधिकारी व बारामतीचे तहसिलदार यांना वेळोवेळी या कर्ज वसुली करणार्‍यांबाबत निवेदन दिले, जोपर्यंत कोरोनाचे सावट संपत नाही तोपर्यंत कर्ज वसुली थांबवावी अशा प्रकारचे निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी संबंधित खात्यांना याबाबत सूचना व आदेश दिले त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना कर्ज वसुली करणार्‍यांपासून काही काळ तरी सुटका मिळाली.

या सर्व बाबींचा विचार करीत वस्ताद अस्लम शेख यांचा सत्कार करण्यात आला व कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यांनी यावेळी सर्व कर्जदारांना आवाहन केले की, कर्ज वसुली करण्यास आलेल्या लोकांशी सौजन्याने बोला, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा ऐकत नसतील तर मला (मो.नं.9552454347) संपर्क करा. तरीही ते ऐकत नसतील तर कायदेशीर मार्गाने संबंधित अधिकार्‍यांनी दिलेल्या पत्रान्वये त्यांच्याकडे आपली गार्‍हाणी मांडू. त्या लोकांशी भांडत बसू नका कारण तेही कोणाचे तरी नोकर आहेत त्यांचाही संसार आहे. त्यांनाही मुलं-बाळ, कुटुंब आहे. त्या वसुली अधिकारी व कर्मचार्‍यांनी काम नाही केले तर त्यांचा पगार संबंधित संस्था थांबविते असे विविध प्रश्र्न असतात. कोणताही कर्जदार कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने बोलत नाही आपण फक्त त्यांना मुदत मागत आहे व जे मासिक हप्ते भरले नसतील ते हप्ते विना व्याज लावता ते मुद्दलेत वर्ग करून नविन वर्षापासून हप्ते नियमित करावे ही मागणी आपण मांडत आलेलो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!