बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली खरी, मात्र याचिका दाखल करण्याचे कटकारस्थान कोणी केले, याचिका दाखल करण्यास जाताना केलेल्या वाहनात कोणत्या संघाच्या पंपावर गाडीत डिझेल भरले, कोणी भरले व इतर खर्चास आर्थिक मदत करणारे कोण? या बहाद्दरांनी उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा यामध्ये ओढले असल्याचा अपप्रचार सुद्धा केला. या सर्व प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी पक्षांतर्गत ज्या कोणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष विरोधात कटकारस्थान रचले त्याची चौकशी होणे पक्षाच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे आहे. नाहीतर कुंपनच शेत खात असेल तर…
बारामती नगरपरिषदेच्या मालकीची सिटी सर्व्हे नं.908 ते 914 मधील 3.408 चौ.मी.जागेपैकी वाणिज्य वापरासाठी असलेली 460.80 चौ.मी.जागा वगळून उर्वरीत 2947.20 चौ.मी. जागा नटराज नाट्यकला मंडळ, बारामती यांना कलादालन या प्रयोजनासाठी दिर्घमुदतीच्या भाडेपट्ट्याने देणेबाबतचा ठराव बारामती नगरपरिषदेच्या कौन्सिलने एकमताने केला होता. तसा ठराव महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 92 मधील तरतुदीनुसार हस्तांतरणास तसेच महाराष्ट्र नगरपालिका (स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण) नियम 1983 च्या नियम 21 मधील तरतुदीनुसार नटराज नाट्यकला मंडळ, बारामती यांना 30 वर्षाच्या भाडेपट्ट्याने दि.18 ऑगस्ट 2021 च्या पत्रान्वये देण्यास शासन मान्यता देण्यात आली. त्या मान्यतावर महाराष्ट्र शासनाचे उपसचिव स.ज.मोघे यांचे हस्ताक्षर सुद्धा आहे.
बारामती नगरपरिषदेवर एकहाती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता आहे. नगरपरिषदेने एकमताने मंजूर केलेल्या ठरावाबाबत कौन्सिलमधील सदस्यांना मनात तिळमात्र शंका येता कामा नये. तरच पक्षाचे, पक्षाच्या नेत्यांचे विचार, ध्येय, धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यासारखे होईल.
मात्र काही सदस्यांनी कौन्सिलमधून उठून दोन्ही हाताला चूना लावून चौका-चौकात बोंबलण्याचे व केलेल्या ठरावाला न्यायालयाचे दार दाखविणार्या छुप्या सदस्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांतर्गत कारवाई होणार का? याबाबत पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. पक्षात तन-मनाने ध्येय, उद्दीष्ट अंगी बाळगत सर्वसामान्य कार्यकर्ता काम करीत असतो. त्या कार्यकर्त्यांकडून क्षुल्लक चूक झाल्यास त्याला पदातून मुक्त करून त्यास घरचा रस्ता दाखविण्याचे काम केले जाते. परंतु, आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची नगरपरिषदेवर सत्ता असताना याच नगरपरिषदेच्या कौन्सिलमधील काही सदस्यांनी ठरावाच्या विरोधात व्यक्ती उभा करून त्यस तन-मन-धनाने सहकार्य केले म्हणे, त्या छुप्या सदस्यांवर पक्षांतर्गत कारवाई होणार! का या सदस्यांनी गरम खिसा मोकळा होईपर्यंत व पँट फाटेपर्यंत पळून निवडून आले म्हणून यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार नाही का? असाही पक्षातील कार्यकर्त्यांना प्रश्र्न पडलेला आहे.
बारामती नगरपरिषदेत दोन गट आहे म्हणतात, एक गट बारामती नगरीचा सर्व जाती-धर्माला व प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन विकासात्मक दूरदृष्टीकोन ठेवून नगरपरिषदेत काम करीत आहे. तर दुसरा गट त्याला गट म्हणता येणार नाही कारण यात चारच टकुजी आहेत. या गटात यापूर्वी असणारे खांद्याला खांदा लावून काम करणारे सदस्य आज या गटापासून कोसो दूर झाले. या गटाचा प्रमुख स्वत:चा, स्वत:च्या नात्या-गोत्याचा, पै-पाहुण्यांचा विचार करून बरोबर फिरणार्यांना तेल गेले, तूप गेले हातात मात्र राहिले धुपाटणे अशाप्रकारे उपाशी ठेवत असेल तर का म्हणून या प्रमुखाच्या मागे घाण्याच्या बैलाप्रमाणे फिरायचे त्यामुळे ते सदस्य आपोआपच दूर झाले. म्हणतात ना, सुंठीवाचून खोका गेला या म्हणी प्रमाणे झाले. या गटाने कधीही इतर सदस्यांमध्ये कामाबाबत जागृती केली नाही किंवा स्वत:कडे असणारे ज्ञान दाबून ठेवले. इतरांवर री-ओढण्याशिवाय दुसरे कामच केले नाही. या गटाने इतर तज्ञ, वरिष्ठ सदस्य काय करतात, कसा अभ्यास करतात, कसे प्रकट होतात याची साधी कृती त्यांना कधी करता आली नाही. गेल्या साडेचार वर्षात स्वत:च्यात व बरोबर असणार्या चार टकूजींमध्ये सुधारणा करता आली नाही. जो विरोध करेल त्याला छुप्या मार्गाने काटा काढण्याचा सतत या गटाने प्रयत्न केला व करीत आहेत.
आज कौन्सिलच्या ठरावाला कौन्सिलमधील काही सदस्य षडयंत्र रचून ठरावाला न्यायालयात आव्हान देण्यासाठी व्यक्ती तयार करीत असतील किंवा त्या व्यक्तीस कृती करण्यास प्रोत्साहन देत असतील तर उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यावर कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भविष्यात या चार टकूजींना पुन्हा कधीही नगरपरिषदेची पायरी चढू देणार नाही असा निर्णय घेणार या निर्णयाकडे पक्षातील सर्वसामान्य गोर-गरीब, निष्ठावंत कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.