अशोक घोडके यांच्याकडून..
वतन की लकीर (ऑनलाईन): आम्ही विकासात्मक कामे करताना कामाची टिमकी कमी वाजवितो, काम मात्र जास्त करतो असा टोला राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांना लगावला.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आयोजित युवक शाखा उद्घाटन व भव्य युवक मेळावा शनिवार दि.4 सप्टेंबर रोजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ना.भरणे बोलत होते.
या मेळाव्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, शिवाजी पानसरे, युवक तालुकाध्यक्ष ऍड.शुभम निंबाळकर,सागर मिसाळ,सचिन खामगळ, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष मयुर ढावरे, वसीम बागवान इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.भरणे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षांतर्गत मागच्या निवडणुकीतील गट-तट बाजूला ठेवून पक्षवाढीसाठी काम केले पाहिजे. येणार्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, इंदापूर नगरपरिषद या संस्थांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून जातील व पक्षाचा झेंडा कसा फडकवतील हे पाहावे. कार्यकर्त्यांनी कोणा विरोधात अर्ज देवू नका, कोण कसे आहेत, कोण काय करतो याची मला सर्व माहिती आहे. दुसर्याकडे बोट दाखविण्यामध्ये वेळ न घालवता पक्षवाढीसाठी काम करा व आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात केलेल्या विकास कामांची टिमकी जास्तीत जास्त कशी वाजेल याकडे लक्ष द्या असेही त्यांनी यावेळी सांगितले.
येणार्या तीन वर्षाच्या काळात एवढा निधी आणणार की इंदापूर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकणार आहे. पोस्टरबाजी न करता घरा-घरात विकास कामे पोहचविण्याचे काम युवकांनी केले पाहिजे. येणार्या काळात पाण्यासाठी महिलांच्या डोक्यावरील हंडा दूर करून प्रत्येकाच्या घरात नळ जोड कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे. दुष्काळी भागात शेतकरी बांधवांना पाणी कसे मिळेल हे सुद्धा पाहणार आहे. माझे मंत्री पद मी मिरविण्यासाठी नाही इंदापूर तालुक्यातील गोर-गरीब, दु:खी, पिडीत व शेतकर्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. स्थानिक स्वराज्याच्या निवडणूका तोंडावर आलेल्या आहेत ढोंगी लोकं येतील, स्वत:चा स्वार्थ साधत प्रचार करतील जातीय तेढ निर्माण करून डोकी भडकवतील याकडे दुर्लक्ष करून विकास हा मुद्दा समोर ठेवून आमच्या पाठीशी रहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
इंदापूर तालुक्याची 19 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती हे नागरीकांनी जाणले पाहिजे. एवढं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम केले आहे. विकास कामे करणार्यांना डोक्यावर घेवू नका, उचलू नका पण त्यांच्या रस्त्यात मात्र काटे, काचा टाकू नका असेही त्यांनी यावेळी नम्रपणे उपस्थित सर्वांना सांगितले.