बारामती(वार्ताहर):नागरिकांना आपल्या हक्काची जाणीव अधिक प्रगल्भ होत असताना त्याला प्रतिसाद म्हणून प्रशासनाने देखील लोकांप्रती असलेल्या सेवेची हमी देणारी व्यवस्था तयार केली. संकट कोणतेही असो त्या संकटाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सदैव तत्पर असतात. त्यामध्ये बारामती शहर पोलीस स्टेशन व या पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळणारे नामदेव शिंदे हे कदापिही मागे राहिलेले नाही. याचाच प्रत्यक्ष अनुभव शिवरत्न पेट्रोलियम बारामतीचे मालक गणेश शिंदे यांना आला आहे.
इंदापूर रोडलगत गणेश शिंदे यांचा शिवरत्न पेट्रोलियम नावाने पेट्रोल पंप आहे. या पंपावर काही गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी दोन वेळा गोंधळ घातला होता. मध्यंतरी या युवकांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारून, चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून 18 हजार रूपये काढले.
पंप मालक शिंदे यांना ही बाब कळाली असता त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याशी संपर्क साधला घडलेली हकीकत सांगितली. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी तत्परता दाखवीत सदरील युवकांना दोन तासात पकडून अटक केली व पंपावर गोंधळ घालणार्यांना सुद्धा अटक केली.
सदरची कारवाई झालेपासून पुन्हा कोणत्याही प्रकारची कोणीही दादागिरी व गुंडगिरी केली नसल्याचे गणेश शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना लेखी पत्राद्वारे कळविले.
बारामतीमध्ये ना.अजित पवार यांचा दरारा असल्यामुळे माझ्यासारखा सामान्य माणूस रस्त्यावर व्यवसाय करू शकतो असेही गणेश शिंदे यांनी म्हटले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असे कर्तव्यनिष्ठ व सक्षम अधिकारी आणलेबद्दल ना.अजित पवार यांचे अभिनंदन केले व पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे हे चोख कर्तव्य बजावित असल्यामुळे त्यांचे सुद्धा अभिनंदन त्यांनी केले आहे.