मनसेचे ‘मुख्याधिकारी देता का? मुख्याधिकारी’ आंदोलन

बारामती(वार्ताहर): राज्याच्या माझी वसुंधरा अभियानात 761 गुणांसह राज्यात 12 वा तर विभागात तिसरा क्रमांक पटकाविलेल्या बारामती नगरपरिषदेस काही महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकारी देता का? मुख्याधिकारी असे प्रवेशद्वारावर हटके आंदोलन केले आहे.

बारामती नगरपालिकेचा कारभार गेले काही महिने मुख्याधिकार्‍यांविना चालू आहे त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडचणी होत आहेत आणि जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कोविड काळात मुख्याधिकारी नसल्याने कोविड नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना आखताना देखील अडचण आहे. बारामती तालुक्यातील नव्याने आढळणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात आढळणार्‍या कोरोना रुग्णांची संख्येपेक्षा कित्येक पटीने जास्त असताना देखील बारामतीत मुख्याधिकारी नसणे ही लाजिरवाणी बाब आहे.

उपमुख्याधिकारी कसलीही जबाबदारी न घेता सरळ नागरिकांना सांगतात की तुम्ही जाऊन प्रांत साहेबांना भेटा. नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कोणाचा वचक नसल्याने ते पण काम टाळत आहेत व मुख्याधिकारी नसल्याचे कारण पुढे करत प्रत्येक काम टाळले जात आहे. बारामतीत नगरपालिकेला मुख्याधिकारी नियुक्त होण्यास विलंब का लागतो असा देखील प्रश्न लोकांना पडला आहे.

यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, बारामती तालुका अध्यक्ष निलेश वाबळे, स्वप्नील मोरे, प्रवीण धनराळे, अमोल गालिंदे, भार्गव पाटसकर यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!