बारामती(वार्ताहर): कोरोना सारख्या अदृश्य शत्रूबरोबर लढता..लढता नागरीकांचे प्राण गेले. मात्र, बँक, फायनान्स् व संस्थांकडून होणारे हप्त्याच्या मागणीचे वार कोण दूर करणार, यांच्या सततच्या हप्ता भरण्याच्या तगाद्यापासून कधी मुक्ती मिळणार असा प्रश्र्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. या प्रश्र्नासाठी मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे बारामती तालुका अध्यक्ष वस्ताद अस्लम शेख यांनी याबाबत सतत पाठपुरावा करीत, दंड थोपटत बारामती उपविभागीय अधिकारी यांना दि.13 ऑगस्ट 2021 रोजी लेखी मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. यापुर्वी सुद्धा त्यांनी याबाबत सतत पाठपुरावा केलेला आहे व वेळोवेळी निवेदन व अर्ज सुद्धा दिलेले आहेत.
जागतिक कोरोना महामारीत नागरीक आरोग्य वाचवयाचे की, पैसा कमवायचा या द्विधा परिस्थिती असताना, पैसा कमविला नाही तर बँक, फायनान्स व पतसंस्थांकडून काढलेल्या कर्जाचे हप्ते भरायचे कसे हा प्रश्न सध्या सर्वांना भेडसावत आहे.
संचारबंदी, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या हाताला काम राहिले नाही. कित्येकांच्या नोकर्या गेल्या, छोटे-मोठे लघुउद्योग ठप्प झाले यामध्ये सर्वाची आर्थिक परिस्थिती रसातळाला गेलेली आहे.
निवेदनात केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे:-
बँक, फायनान्स व पतसंस्थांचे लॉकडाऊन, संचारबंदी काळातील कर्जाचे हप्ते ऑगस्ट-2021 पासून लागू करण्यात यावे. याकाळातील व्याज व हप्ते पुर्णपणे माफ करण्यात यावे.
घरगुती वीज पुरवठा करणारी विज वितरण कंपनी वीज बिल भरले नाही म्हणून उठसूट वीज खंडित करीत आहेत. हाताला काम नसल्याने व आर्थिक परिस्थीती बिकट झाल्याने कित्येकांनी वीज बिल भरले नाही त्यामुळे त्या वीज बिलापोटी हप्ते बांधून द्यावेत.
लॉकडाऊन व संचारबंदीमध्ये ज्या नागरीकांनी भाडेतत्वावर घेतलेले व्यावसायिक गाळे व प्लॅट धारकांच्या मालकांना 50टक्के भाडे आकारण्याबाबत योग्य ते आदेश द्यावेत.
महाराष्ट्र शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जे कर आकारले जातात ते कर माफ करावे. व दिवाळी झाल्यानंतर कर आकारणी करण्यात यावी तसे अध्यादेश काढण्यासाठी मागणी आपल्या वरिष्ठांकडे करावी.
या मागण्यांची दखल घेण्यासाठी आपण संबंधित खात्यांना योग्य ते आदेश द्यावेत व सर्वसामान्य नागरीकांमध्ये रोगाची ज्याप्रमाणे भिती निर्माण झालेली आहे. त्याप्रमाणे कुटूंबातील गरजा व बॅक, फायनान्स व संस्थांचे हप्ते, वीज बिले कसे भरावे याबाबत भिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये रोगाची व बँकांची असणारी भिती दूर करून भयमुक्त वातावरण निर्माण करण्यास प्रयत्न करावा अशीही मागणी केली आहे.