बारामती(वार्ताहर): येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता धनंजय गावडे यांनी कोरोना काळात अखंडित ग्राहकांची जी सेवा केली तत्परता दाखविली त्याबद्दल मानव हक्क संरक्षण जागृतीचे तालुकाध्यक्ष अस्लम शेख यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांमध्ये वीज ही महत्वाची गरज होऊन बसली आहे. कोरोना व लॉकडाऊन काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या बरोबरीने वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकार्यांनी सुद्धा जीवाची बाजी लावून सेवा बजावली, तत्परता दाखविली या सर्व बाबींचा विचार करून त्यांना हा कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला. लॉकडाऊन काळात नागरीकांच्या हाताला काम नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असताना अशा काळात ग्राहकांची आर्थिक परिस्थितीचा विचार करीत वीज बिल भरणा करण्यासाठी हप्ते देणे, सवलत देणे, वीज खंडित न करणे इ. सारखे ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेऊन मोलाचे सहकार्य केले. रात्री-अपरात्री वीज खंडीत झाल्यानंतर सर्व फौजफाटा घेऊन तत्परतेने लागलीच वीज जोड सुरळीत करणे इ. कामे सेवा चोख पद्धतीने बजावली आहे.
पुरस्कारामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, गुलाब पुष्प देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मानव हक्क संरक्षण जागृतीचे तालुकाध्यक्ष अस्लम शेख, सत्याचा प्रहार पुणे जिल्हा संघटक अमीन शेख, बाळासाहेब सरतापे, मुस्लीम एकता आघाडीचे अध्यक्ष मौलाना अल्ताफहुसेन, किरण मदने इ. मान्यवर उपस्थित होते.