बारामती(वार्ताहर): वाढती महागाई लक्षात घेता बारामती तालुका नाभिक संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये कटींग दाढीच्या दरामध्ये 15 टक्के वाढ दि.15 ऑगस्ट 2021 पासुन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
नवनियुक्त तालुक्याचे अध्यक्ष पै.सुधाकर माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते अनिल दळवी, हेमंत जाधव, महेश वारूळे, महेंद्र यादव, राधेश्याम साळुंके इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तालुक्याची नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून पै.सुधाकर माने, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश साळुंखे, उपाध्यक्ष सुदाम कढणे, सचिव किरण किर्वे, खजिनदार गणेश चौधरी, सहसचिव किसन भाग्यवंत यांची निवड करण्यात आली.
पै.माने यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पुढील काळात समाजमंदिर, हौसिंग सोसायटी, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना इ. योजनांचा लाभ समाजातील लाभार्थ्यांना मिळवून देणे. समाजातील युवक व युवतींना रोजगार प्रशिक्षण शिबीर, वधु-वर सूचक मेळावे तसेच समाजातील विविध प्रश्र्नांवर संघटनेच्या माध्यमातून मार्ग काढून जास्तीत जास्त समजा हिताचे निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दर वाढले की दोन्ही हाताने बोंबा-बोंब!
टाळेबंदीमुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात सलून व्यवसायिक आणि कारागिरांना दुकाने बंद असल्याने रोजच्या जगण्याचा गंभीर प्रश्र्न निर्माण झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंचे दरात सतत वाढ होत असताना त्याबाबत कोणीही आवाज उठवत नाही किंवा रस्त्यावर येत नाही. मात्र कोरोना सारख्या संकटात सलून व्यावसायिक सापडलेला असताना त्यांनी केलेली वाढ लगेच काहींना बोचत असते व लगेच दोन्ही हाताने बोंबा-बोंब केली जाते. याला काय म्हणावे….