तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून भारतातील अनेक लोकही सोशल मिडीयावर तालिबानचे समर्थन करताना दिसत आहेत. यासंदर्भात यूपी, दिल्ली, आसामसह काही राज्यांतून सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. दरम्यान, आसाम पोलिसांनी यावर कडक कारवाई करून अटक केली आहे. या अटक केलेल्यांवर बेकायदेशीर क्रिया (प्रतिबंध) कायदा, आयटी कायदा आणि सीआरपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर तालिबानचे समर्थन करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं म्हणून लावजी जीभ टाळ्याला असे होता कामा नये.
यामध्ये मेट्रोपोलिटन, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येकी दोन जणांना अटक करण्यात आली. दरांग, कचर, हैलाकंडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजाई जिल्ह्यातून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली.
सोशल मिडीयावर पोस्ट करतांना काळजी घेणे गरजेचे आहे तसेच अफगाणिस्तान तालिबान वादावर पोस्ट लाईक करतांना देखील सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. आक्षेपार्ह पोस्टसाठी सोशल मीडियावर सतर्क आणि देखरेख करत आहेत.
आपल्या भारत देशाचे संविधान, लोकशाही व संस्कृती उच्च आहे. मात्र, काहींच्या मनात तालिबान, पाकिस्तान यांच्याबाबत का प्रेम येते हेच कळत नाही. म्हणजे खायचे भारताचे गुण गायचे इतर देशाचे अशी काहींची अवस्था आहे. खरं तर अशा लोकांना लक्ष करून यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून भारताबाहेर हाकलून दिले पाहिजे. भारतातील 14 लोकं जर तालिबानचे समर्थन करण्याचे धाडस दाखवीत असतील तर या लोकांच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.
इतर देशातील मुस्लीम समाजापेक्षा भारतातील मुस्लीम समाज सुख-शांतीने नांदत आहे. भारताचे संविधान, लोकशाही व संस्कृतीवर तो अतोनात प्रेम करीत आलेला आहे. ङ्गभारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.ङ्घ हे एका सुरात तो शैक्षणिक जीवनापासून म्हणत आला आहे, त्यावर कृती करीत आलेला आहे व करीत आहे. कोणत्याही धर्मात असे लिहिलेले नाही की, तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाशी गद्दारी करा. इस्लामधर्मात ज्या भूमित तुम्ही राहता त्या भूमिशी इमाने इतबारे राहिले पाहिजे असे सांगितलेले असताना काहींना आजही दुसर्या देशात डोकावून त्यांचे गुण गाण्याचे काम केले जाते. असं का होते, तुम्हाला भारताने काय कमी केले पवित्र संविधानाने समान हक्क व अधिकार दिले. तरीही तुमची अशी वृत्ती असेल तर तुम्ही या भूमीशी नाही तर स्वत:च्या आईशी गद्दारी करीत आहात असे म्हटले तर वावगे ठरू नये.
मध्यंतरी कसाब व त्याच्या साथीदारांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्याचा निषेध तमाम भारतीयांनी तन-मनाने केला होता त्यात तिळमात्र शंका नाही. मुस्लीम धर्मियांनी तर या दहशतवाद्यांचे शव या भूमित दफन न करण्याचा जो निर्णय घेतला होता तो या भारत भूमिशी असलेली निष्ठा, प्रेम होती. सर्वच देशात धर्मांध लोकं असतात त्यामुळे इतर समाजाला त्याचा त्रास होत असतो. आपआपल्या धर्माचे प्रेम चार भिंतीत असावे मात्र, देशप्रेम चार भिंतीत राहता कामा नये.
आज भारतातील सामाजिक सलोखा निर्माण करणारी मंडळी राजकीय लोकांकडे बोट दाखवतात. ही लोकं राजकारणासाठी काहीही करतील, दोन धर्मात भाडणं लावतील स्वत:चा स्वार्थ साधतील. मात्र, ज्यावेळी भारत देशाचा प्रश्र्न येतो त्यावेळी सर्व धर्मांनी आपआपले धर्म चार भिंतींत ठेवले पाहिजे. राजकारण करणार्यांनी राजकीय जोडे बाहेर काढून देशासाठी एकत्र आले पाहिजे. सर्व घटकांनी तन-मन व धनाने संघटीत होवून भारत देशासाठी एकत्र आल्यावर तालिबान, पाकिस्तानसारखी अशी कितीही राष्ट्र एकत्र होवून जरी भारतावर आक्रमणाची भूमिका ठेवली तरी ती आपण एकीच्या जोरावर परतून लावण्याची क्षमता ठेवू. अफगाणिस्तानसारखी अवस्था भारताची भविष्यात तर नाहीच पण कोणी स्वप्नात सुद्धा आणू नये. कारण येथील पवित्र संविधान, लोकशाही व संस्कृतीवर संपूर्ण भारत देश टिकलेला आहे.