पुणे : उद्योग भेट शुल्क, महाविद्यालय नियतकालिक शुल्क, प्रयोगशाळा ठेव, अन्य ठेवी, आरोग्य तपासणी शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क, अश्वमेध महोत्सव शुल्कात 100 टक्के कपात करण्यात आली आहे. 2021-22 या वर्षांसाठी विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालये आणि परिसंस्थांना ही शुल्ककपात लागू असेल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2021-22 या शैक्षणिक वर्षांसाठी शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा, जिमखाना शुल्क, संगणक सुविधा शुल्कात 50टक्के, उपक्रम शुल्कात 75 टक्के , परीक्षा शुल्कात 25 टक्के कपात करण्यात आली आहे. जी महाविद्यालये ऑनलाइन नियतकालिक प्रसिद्ध करतात त्यांना 25 टक्के आणि जी महाविद्यालये मुद्रित नियतकालिक प्रसिद्ध करतात त्यांना 50 टक्के शुल्क घेण्याची मुभा आहे. जी महाविद्यालये कोणत्याही प्रकारचे नियतकालिक प्रसिद्ध करत नाहीत त्यांना शुल्क घेता येणार नाही. जी महाविद्यालये ऑनलाइन उपक्रम राबवतील त्यांना 50 टक्के शुल्क घेता येईल, तर उपक्रम न राबवणार्या महाविद्यालयांना शुल्क आकारता येणार नाही. विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊ लागल्यावरच वसतिगृह शुल्क लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विविध प्रकारचे शुल्क कमी करण्यासह करोना संसर्गामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांंचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले असून, शुल्क कपातीच्या निर्णयामुळे आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांंना दिलासा मिळाला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. शैक्षणिक कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे शुल्कात कपात करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. त्यासाठी आंदोलने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांना शुल्कात कपात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शुल्क कपातीचा प्रस्ताव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारात घेऊन डॉ. सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती केली. या समितीने शुल्क कपातीसंदर्भातील शिफारसी अहवालाद्वारे सादर केल्या. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हा अहवाल आणि शिफारसी स्वीकारल्या. त्यानंतर विद्यापीठाकडून शुल्क कपातीबाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले.