बारामती(वार्ताहर): जल,जंगल, जमीन टिकवण्याचे काम खरे तर आदिवासी समाजाने केले असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मुक्ता अंभेरे यांनी सांगितले.
बारामती नगरीमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने देसाई इस्टेट मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.अंभेरे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष विशाल जाधव होते. प्रमुख वक्ते प्राध्यापक राजेंद्र वळवी तर समाजाचे बारामती तालुका प्रतिनिधी म्हणून शंकर घोडे उपस्थित होते.
राजेंद्र वळवी यांनी आदिवासी समाजातील चालीरीती व रूढी परंपरा याविषयी सविस्तर माहिती दिली.
आदिवासी समाजातील नोकरदार वर्ग यांनी खेडोपाडी असणार्या आदिवासी समाजाला आपल्याबरोबर घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी तसेच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी पुढाकार घ्यावा असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विशाल जाधव यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरूवात आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना तसेच महामानवांना अभिवादन करून करण्यात आली. तसेच कोरोना काळात व अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
यावेळी दहावी व बारावी मध्ये उत्तम गुण संपादन करणार्या गुणवंतांचा सत्कार करून श्रेया रनमोळे या एमबीबीएस प्रथम वर्षात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीचा भारतीय संविधान व गुलाब पुष्प देऊन प्रमुख अतिथी यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शंकर घोडे म्हणाले की, 9ऑगस्ट,1994 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्या प्रमाणे सर्व जगभर 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक आदिवासी दिवस आदिवासी समाजासाठी का महत्वाचा आहे व का साजरा केला जातो या विषयी सविस्तर माहिती शंकर घोडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कोकणे यांनी तर स्वागत गणपत जाधव यांनी केले. शेवटी आभार मीननाथ कौटे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल जाधव मित्र परिवाराने मोलाचे प्रयत्न केले. या कार्यक्रमास बारामती नोकरीनिमित्त आलेले आदिवासी समाजाचे बहुसंख्य बंधू आणि भगिनी उपस्थित होते.