पुणे (वतन की लकीर ऑनलाईन): सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्ह रेट गेल्यास पुन्हा निर्बंध लागु करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी सांगितले. इतर तालुक्यात ग्रामीणचा पॉझिटिव्ह रेट नियंत्रणात आल्यानंतर पुढच्या आठवड्यात याबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुणेकरांची स्वाक्षरी मोहीम, दुकानांसमोर घंटानाद आंदोलन करून व्यापार्यांनी शासनाचे लक्ष वेधले. खटले भरले तरी चालेल, पण बुधवारपासून चारनंतर दुकाने उघडी ठेवू असा आक्रमक पवित्रा व्यापार्यांनी घेतला. त्याची दखल घेत पुण्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी पुण्यात निर्बंध शिथिल केल्याने पुणे व्यापार्यांचा जीव भांड्यात पडला.
राज्यभरातील जवळपास 25 जिल्ह्यांना कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र पुणे, सातार्यासह 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली होती.
पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार तर हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात शनिवारी आणि रविवारी सर्व सेवांना दुपारी चारपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल्सदेखील सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून मॉल्समध्ये फक्त दोन लस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तर हॉटेल चालक व दुकानदारांना दोन्ही डोस घेणे बंधनकारक केले आहे.
पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहेत. जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी, पुणेकरांना मास्क वापरणं बंधनकारक राहील.
ग्रामीणचा पॉझिटिव्ह रेट नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल. याबाबतचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेतला जाईल. नियम तोडून काही लोक काही गोष्टी करतात. वास्तविक माझं सर्वांना आवाहन आहे की, शासन बळजबरीने हे करत नाही. पुण्याकडे दुर्लक्ष असं अजिबात नाही. पुण्याबद्दल कुणी राजकारण करू नये. असेही उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी सांगितलं.