माळेगाव(वार्ताहर): कृषि महाविद्यालय व सामान्य ग्रामीण शेतकरी यांच्यातील दरी कमी करून सुधारीत कृषि तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचवण्याचे काम कृषि कन्या यशस्वी रित्या करीत आलेले आहेत. याच माध्यमातून माळेगाव कॉलनी-शारदानगर येथील कृषी कन्या अमृता कल्याण पाचांगणे, स्वाती रविंद्र पवार आदींनी बारामती कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागृता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव (रावे प्रोग्राम) कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन शेतकर्यांना एकरी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने माती परिक्षण करणे किती महत्वाचे आहे, हे पटवून देण्यासाठी कृषी कन्या विद्यार्थीनी पुढे आल्या आहेत.
सुमारे अडीशे विद्यार्थी आपापल्या गावालगत प्रगतशिल शेतकर्यांच्या शिवारात रावे प्रोग्राम पुर्णत्वा आणण्यासाठी सरसावले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक पातळीवर हा उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमात वृक्षारोपन, प्रयोगशिल शेतकर्यांच्या शिवाराला भेटी देणे, वेगवेगळ्या पिकांवर प्रात्यक्षिके घेणे, शेती व शेतीपुरक उद्योग धंद्याची माहिती घेणे, जनावरांचे संगोपन आदी बाबींचा अभ्यास संबंधित विद्यार्थी करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, बारामती तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी रावे प्रोग्रामसाठी माळेगाव, पणदरे, सांगवी, नीरावागज आदी बागायत पट्ट्यातील गावे निवडली आहेत. विशेषतः या उपक्रमांतर्गत अनेक संबंधित विद्यार्थी प्रयोगशिल शेतकर्यांच्या शिवारातील अधुनिक टेक्नालॉजीची माहिती समान्य शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोचवून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. सहाजिकच या उपक्रमामुळे सामान्य शेतकर्यांना शिवारात कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्याचे, याचे ज्ञान घर बसल्या मिळत आहे. त्यामुळे या कृषी दूतांना संबंधित शेतकरी चांगले सहकार्य करीत आहेत.