बारामती(वार्ताहर): कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर प्रत्येकाने स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी दक्षता घ्यायला हवी, नियमित व्यायाम व प्राणायम करायला हवा. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही, त्यामुळे सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी केले.
शहरातील देसाई इस्टेट परिसरातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे बारामती शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव व देसाई इस्टेट मित्र परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्याचे उदघाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते.
जळोची येथील अक्षय आनंद कम्युनिटी सेंटरमध्ये शिबीरात आरोग्य तपासणी करण्यात आली. शुगर, ई.सी.जी, महिला आरोग्य तपासण्या, लहान मुलांचे आजार व तपासणी, दातांची तपासणी, हृदयरोगाबाबतच्या तपासण्या, मणका गुडघेदुखीसह इतरही आजारांबाबतच्या तपासण्या केल्या गेल्या. या शिबीरामध्ये डॉ. विशाल मेहता, डॉ. राजेंद्र व डॉ. सौरभ मुथा, डॉ. हनुमंत गोरड, डॉ. साकेत जगदाळे, डॉ. मेहुल ओसवाल, डॉ. सनी शिंदे, प्रसाद साळुंखे, डॉ. रोहन अकोलकर आदींनी रुग्णांची तपासणी केली. या शिबीरात रुग्णांची तपासणी केल्याचे विशाल जाधव यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड, भाग्यश्री धायगुडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी कोरोना योध्दा म्हणून कार्य केलेल्या विविध पदाधिकार्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक आयोजक विशाल जाधव यांनी केले. सुत्रसंचालन शंकर घोडे यांनी केले.