बारामती(वार्ताहर): शहरातील खाटीक गल्लीमध्ये डोळ्यात चटणी टाकून गळ्यातील सोन्याची साखळी चोरणार्या तिघांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी नामे नसीम दिलावर इनामदार (रा. कसबा, बारामती), फिरोजा असिफ सय्यद (रा. दौंड), सलीम मुजीब सय्यद (रा. पुणे) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अर्धा तोळा वजनाची सोन्याची साखळी व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची घटना 4 जुलैला बारामती शहरातील खाटीकगल्ली येथे घडली होती. आरोपींनी घरात घुसून डोळ्यात चटणी टाकून सोन्याची साखळी चोरून नेली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीद्वारे तपास करून या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सोनसाखळी चोरीची कबुली दिली. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री मिलीद मोहिते सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो, पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंद यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक रूपेश साळुके, पो.कॉ. सुहास लाटणे, दशरथ इंगोले, अजित राऊत, तुषार चव्हाण, अकबर शेख यांनी केली.