ताठ मानेने जगायला शिकविणारे आण्णाभाऊ

शेतकरी आणि गिरणी कामगारांची दुःखे पाहिलेल्या, भोगलेल्या अण्णा भाऊंना. साम्यवादी विचार आपलासा वाटणे स्वाभाविकच होते. दलित-शोषित पीडितांना माणूस म्हणून ताठ मानेने जगायला शिकविणारे हे नवे तत्त्वज्ञान अण्णा भाऊंना इतके भावले की, अखेरपर्यंत त्यांनी त्याची कास सोडली नाही. स्तालिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनीजनांची मुक्तिसेना, लेनिन शुभनामाचे गाऊ गान या सार्‍यांमधून त्यांनी साम्यवादाची मुक्त आणि मनःपूर्वक स्तुती केली. ’आपली प्रतिभा त्यांनी साम्यवादाच्या प्रचारासाठी राबविली’ अशी टीका अण्णा भाऊंवर नेहमीच झाली. परन्तु कविमनाला जे भिडते त्याचीच अभिव्यक्ती त्याच्या काव्यातून घडते, हे कसे नाकारता येईल? ’मोले घातले रडाया पद्धतीचा प्रचार आणि आंतरिक ऊर्मीतून उचंबळून आलेली कलाकृती ह्यातील जमीनअस्मानाचा फरक लक्षात येत नसेल तर तो साहित्याचा आस्वादक कसला?

साम्यवादाचे निस्सीम उपासक असलेल्या अण्णा भाऊंनी सार्‍या जगातील कामगारांनी, दलित-पीडित-शोषितांनी एक व्हावे या घोषणेचा उद्घोष करीत असतानाच आपले जाज्वल्य देशप्रेमही धगधगते ठेवले होते हे आवर्जून लक्षात ठेवायला हवे. मुंबई, महाराष्ट्र आणि भारत यावरील त्यांचे मनःपूर्वक प्रेम त्यांच्या साहित्यात जागोजागी उमटले आहे. महाराष्ट्र देशा अमुच्या, उठला मराठी देश, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, महाराष्ट्राची परंपरा या केवळ नावांवरूनही ते दिसून येईल. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होताना बेळगाव, कारवार, निपाणी, धारवाड, उंबरगाव, डांग, हा सीमाभाग महाराष्ट्राला दुरावणार, कदाचित मुंबईही वेगळी काढली जाणार ही व्यथा त्यांचे काळीज पोखरीत होती. या व्यथेतून जन्मली एक अप्रतिम लावणी

माझी मैना गावाला राहिली । माझ्या जिवाची होतिया काहिली ।।

अण्णा भाऊंच्या कविमनाला निसर्गसौंदर्याची किती भुरळ पडत होती त्याची साक्ष त्यांच्या गीतांमधून प्रकर्षाने दिसून येते. ’पूर्वेला जाग आली, मोहरली लाली’ या गीतात अण्णा भाऊ म्हणतात, ’भाळी तिलक तिने रेखिला लेवून पुरला, गुलाल उरला नभातून तिने फेकिला । पहाटे पूर्व दिशा उजळली की तिची लाली केवळ आकाशात पसरते. असे नव्हे तर चराचरावर उमटते, ही वस्तुस्थिती आपण सारेच पाहत असलो तरी अण्णा भाऊंना मात्र पूर्वेने कपाळावर कुंकवाचा टिळा रेखून उरलेला गुलाल आसमंतात उधळलेला दिसला. ’रवि आला लावुनी तुरा’ हे नितान्त सुंदर गीत तर संपूर्णच आस्वादायला हवे. सूर्याच्या आगमनाने पृथ्वीवर पसरलेले चैतन्य आणि ओसंडणारा आनंद या गीतात अण्णा भाऊंनी हळुवारपणे टिपला आहे. ’पानापानांत नाचे हा वारा भूप रागाच्या छेडीत तारा। हासे कोकीळ मनी। मोर नाचे बनी। सप्तरंगांचा फुलवून पिसारा म्हणून अण्णा भाऊंनी सूर्योदयाचे एक देखणे शब्दशिल्प निर्माण केले आहे. ’लावणी’च्या सौंदर्याला सोबत घेऊन वाढलेल्या अण्णा भाऊंच्या कविमनाने निसर्गातील सौंदर्यकण नेमके वेचून आपल्या गीतात गुंफावेत यात नवल ते काय? रसिकमनाला मोहविणारी ही गीते महाराष्ट्राला भावली आहेत.

पोवाडे, गीते, नाटक या साज्यातून ज्या साम्यवादी विचारांचा, श्रमिकांच्या समस्यांचा प्रभाव दिसून येतो त्या साम्यवादाची जन्मभूमी असलेल्या सोविएत रशियाला जाण्याचे अण्णा भाऊंचे स्वप्न 1961 साली जेव्हा प्रत्यक्षात उतरले तेव्हा आनंदाने ते पार हरकूनच गेले. एका सच्च्या श्रमिकाच्या कलावन्त मनाला दिसलेला रशिया ’माझा रशियाचा प्रवास’ या छोटेखानी पुस्तकात आपल्याला भेटतो. रस्त्यावरील सामान्य नागरिक, अण्णा भाऊंना ’शाहीरे अझीज’ म्हणणारे बाकूमधील डॉ. हमीद, या सर्वांशी आत्मीयतेने साधलेल्या संवादातून अण्णा भाऊंना रशियातील ’माणूस’ पाहायचा होता. प्रेमात पडलेल्याला प्रिय व्यक्तीचे सारेच सुंदर वाटते. अण्णा भाऊ साम्यवादाच्या प्रेमातच पडल्यामुळे त्यांना रशिया म्हणजे भूलोकीचा स्वर्गच वाटला हे त्यांच्या प्रवासवर्णनातून जाणवतेच. परंतु साम्यवादी देशातील सामान्य माणसाच्या खोल मनात दडलेले सत्य शोधण्याचा अण्णा भाऊंचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या वेगळेपणाने अधिक काळ स्मरणात राहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!