बारामती(वार्ताहर): आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेतृत्व यशपाल (बंटीदादा) भोसले यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीच्या प्रदेश चिटणीसपदी निवड करण्यात आली. माजी आमदार व प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
यशपाल भोसले यांना आंबेडकरी चळवळीतील पँथर ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाते. त्यांनी वेळोवेळी अन्याया विरोधात आंदोलने, मोर्चे, उपोषणे करून न्यायालयीन प्रक्रिया राबवून दलित व इतर समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले. बारामती शहराध्यक्षपदाची भूमिका बजावित असताना महिलांना बचत गट फायनान्स च्या त्रासातून वाचवण्यासाठी असंख्य महिलांचा मोर्चा काढून न्याय मिळवून दिला. बारामती शहर बौद्ध संघटना स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गावोगावी बौद्ध युवक संघटनेचे जाळे निर्माण करून समाजावर होणारा अन्याय दूर करून अन्यायाविरोधात लढण्याचे प्रशिक्षण दिले. सर्व गटातील विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेश व शिक्षण दिले. समाजातील मागासवर्गी विद्यार्थ्यांची फी पूर्णपणे माफ व्हावी म्हणून आंदोलने केली. पदाचा नेतृत्वाचा विचार न करता युवकांची फळी निर्माण करत गेले. संकटकाळी विद्यार्थी व युवकांच्या पाठीशी उभे राहिले. यासर्व कामाचा विचार करीत भाजपाने प्रदेशवर काम करण्याची संधी भोसले यांना दिली आहे.

पुढील काळात अनुसूचित जातीला न्याय मिळवून देण्यासाठी भोसले या पदाचा पुरेपूर फायदा करतील यात तिळमात्र शंका नाही. आंबेडकरी चळवळीतला एक सामान्य कार्यकर्त्यास एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच मिळू शकते असेही नागरीकांमध्ये बोलले जात आहे.
निवडीनंतर बोलताना भोसले म्हणाले की, मी प्रत्येक सुख-दुखात व न्याय हक्कासाठी समाजाबरोबर होतो व यापुढेही राहणार आहे. महाराष्ट्र शासनाने पदोन्नतीचा शासन निर्णय काढून संपूर्ण अनुसूचित जातीवर अन्याय केला आहे. यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून तो शासन निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.