(अशोक कांबळे यांजकडून)
बारामती(वार्ताहर): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या कडक निर्बंधाचा फटका मागील वर्षभरापासून रिक्षा चालकांना बसला आहे. आणि यावर्षीही पुन्हा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा निर्बंध घातल्याने रिक्षा चालकांचे पार कंबरडे मोडले. पण राज्य सरकारने तुटपुंजी का असेना पंधराशे रुपये अनुदान दिल्याने बारामती, दौंड, इंदापूर ऑटोरिक्षा महासंघाच्या वतीने राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहे.
हा निधी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) माध्यमातून देण्यात आल्याने दिलेला निधी अधिकृत व्यक्तीला मिळाला आहे. या निर्बंधामध्ये परवानाधारक ऑटो रिक्षाचालक यांना महिन्याकाठी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर बारामतीसह इंदापूर, दौंड येथील सर्व ऑटो रिक्षा चालकांच्या वतीने राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते.
बारामतीतील राष्ट्रवादी ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दादा शिंदे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो संघटनेचे अध्यक्ष सागर सोनवणे म्हणाले, कोरोनाच्या काळात रिक्षा व्यासायावर मोठा परिणाम झल्याने रिक्षाचालक हैराण झाले आहेत.
इन्शुरन्स भरायला पैसे नसल्याने जवळपास सर्वच रिक्षा पासींग झालेल्या नाहीत. बारामती परिवहनने पासींग साठी मुदत दिली असली तरी इन्शुरन्स भरल्याशिवाय पासींग करता येत नाही. रिक्षा पासींग करण्यासाठी अगोदर सात ते आठ हजार रुपये खर्चून इन्शुरन्स भरावा लागेल. आणि नंतर पासींगचा खर्च हे सर्व कठीण आहे. त्यांच्या मुलाबाळांच्या पोटाचा प्रश्न समोर असताना इन्शुरन्स भरणे अशक्य आहे, तसेच ब्यांकेचे कर्ज त्यावर वाढत चाललेले व्याज हे पाहता आता नेमकं काय करावं असा प्रश्र्न रिक्षा चालकांना पडला आहे.