बारामती(वार्ताहर): येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्या शिवकाळ प्रतिष्ठानच्या करड्या नजरेमुळे व दै.पुण्यनगरीचे विभागीय प्रतिनिधी अमोल यादव यांच्या दक्षतेमुळे एका अज्ञात व्यक्तीला जीवदान मिळाले. आजही माणुसकी जिवंत आहे या कृत्यातून समोर आले.

6 जून 2021 रोजी शिवकाळ प्रतिष्ठान व 10वा बॉईजचे कार्यकर्ते कचेरीरोड परिसरातून घरी जात आसताना दशक्रिया विधी घाट येथे एक व्यक्ती जखमी अवस्थेत पावसाच्या सरी अंगावर झेलत कुडकुडत असताना बघितले. कोरोना काळात स्वकीयांना आज कोणी जवळ करीत नाही या व्यक्तीच्या जखमा पाहुन कोण जाणार हा प्रश्र्न समोर होता. मात्र या कार्यकर्त्यांनी कशाचाही विचार न करता या व्यक्तीच्या जवळ जावून त्याची विचारपूस केली. त्याने नाव,गाव व पाहुणे संबंध सांगितले मात्र, जवळच्या नातेवाईक पाहुण्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. पायावरील जखमा, पावसात भिजलेले कपडे, अंथरूण पाहुन कार्यकर्त्यांच्या मनाला धस्स झाले. कार्यकर्त्यांनी दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी अमोल यादव यांना प्रकार सांगितला. दक्ष पत्रकाराच्या नात्याने त्यांनी घटनास्थळी येऊन सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयात कळविले त्या रूग्णवाहिकेत या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीस घेऊन गेले.
शिवकाळ प्रतिष्ठान व 10वा बॉईजचे ओंकार खोत, करण शिंदे, धिरज ढवाण पाटील, सनी चौधरी, निलेश धालपे, अजय नलावडे, प्रतिक सांगळे यांनी सद्यपरिस्थितीचा कोणताही विचार न करता सदर व्यक्तीस उपचार दिला. सर्वत्र या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.