बारामती(उमाका): महाराष्ट्र शासन कृषि विभागाकडून राबविण्यात येणार्या शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमिनीची माती तपासणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गावातील पिकाखालील क्षेत्र जमिनीची सरासरी प्रमाणे मृद नमुना प्रत्येक गावातील कृषि सहाय्यकांनी गावातील शेतकरी गट/ कृषि मित्र यांचे मदतीने गोळा करून तपासून सदर माहिती एकत्रित करून त्या गावातील जमिनीचा मृद निर्देशांक म्हणजेच त्या गावातील सरासरी जमिनीमध्ये उपलब्ध असणारे मुख्य घटक, दुय्यम घटक, अतिसूक्ष्म प्रमाणात असणारे अन्नघटक इत्यादी माहिती शेतकर्यांना कळावी व आपण आपल्या पिकांना प्रति एकरी किती प्रमाणात खते द्यावी याची माहिती गावच्या ग्रामपंचायतीमध्ये फलकावर लावली जाणार आहे.
बारामती तालुक्यातील मळद येथे मृद तपासणी करून त्याची माहिती ग्रामपंचायती मध्ये एका फलकावर लावण्यात आली. या फलकाचे अनावरण गावचे सरपंच योगेश बनसोडे व उपसरपंच किरण गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडल कृषि अधिकारी सी.के. मासाळ, विश्वजित मगर, गणेश जाधव, कृषि सहाय्यक सुप्रिया पवार, जे.एन.कुंभार, पोलीस पाटील अविनाश गावडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सीएसआर फंडातून एकता सेंद्रिय गटाच्या छत्री वाटप केलेल्या भाजीपाला विक्री स्टॉलला सर्व मान्यवरांनी भेट दिली व शेतकर्यांशी , ग्रामस्थांशी संवाद साधला.