बारामती(वार्ताहर): अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचा श्रीमंत आबा गणपती महोत्सव म्हणजे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी, नावाप्रमाणे आबांचा विसर्जन देखावा डोळ्यात सामावणार नाही अशी भव्य-दिव्य मिरवणूक काढली जाते. मात्र जागतिक कोरोना विषाणूने आई-मुलाच्या नात्यात सुद्धा दरी निर्माण केली आहे. यामुळे सर्व सण, उत्सव चार भिंतीतच राहुन गेलेल्या आहेत. याचे दु:ख सर्वांच्या मनाला ठेस पोहचवून जात आहे.
विसर्जनाची मिरवणुक म्हणजे मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हर्ष, उल्हास, आनंद त्याचप्रमाणात विसर्जनाचे दु:ख ही तेवढेच असते. या मिरवणूकीत थोरा-मोठ्यांपासून ते अबाल वृद्धांची एकच गर्दी उडते. सर्व भक्त गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या चा गजर करीत असतात. आम्हा सर्व भक्तांना सुखात ठेव, आनंदात ठेव व तुझी कृपादृष्टी आमच्यावर कायम अशीच राहू दे, येणारे विघ्न दूर कर अशी प्रार्थना करीत असतात. यावर्षी कोरोना विषाणूचे सावट असल्याने मंडळाच्या पदाधिकार्यांनी शांततेत मिरवणूक काढली. सर्वांचे कोरोनापासून संरक्षण कर व या विषाणूचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी यावेळी मनातून प्रार्थना करण्यात आली.