बारामती(वार्ताहर): बारामती भिगवण रोडवरील एका पुरूषाला स्मीता नावाच्या अनोळखी मुलीचा फोन आला. फोनवरून मैत्री वाढली तिचे लोभस रूप पाहुन पुरूष अधिकच भाळला. थेट फलटण येथील फ्लॅटवर पोहचला. स्मीताची मैत्रिण सुहासीनी, मित्र आशीष पवार व गुरू काकडे या सर्वांनी मिळून महिला अत्याचाराबाबत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली अन्यथा दहा लाख रूपयांची खंडणी मागितली. नाही-हा करीत शेवटी 5 लाख रूपये देण्याचे ठरले. गुरू नावाच्या मित्राने बारामतीत येऊन एक लाख रूपये घेऊन गेला उर्वरीत पैश्यासाठी 8 मार्चला बारामती बस स्थानक ठिकाण निश्र्चित केले होते.
तक्रारदार पुरूष घाबरून इज्जत जाईल या भितीपोटी मानसिक तणावाखाली गेले होते व आत्महत्या करण्याच्या विचारात होते.
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त बारामती शहर पोलीस स्टेशनचा पदभार सहा.पोलीस निरीक्षक ए.के.शेंडगे यांचेकडे होता. सदर पुरूषाने सर्व हकीकत सांगितली त्यानंतर शेंडगे यांनी तातडीने शासकीय पंच बोलावुन पोलीस स्टाफ, सापळा रचून, नोटांचा तपशिल दप्तरी नोंद करून साध्या वेशात खाजगी वाहनांनी बसस्थानकावर जावून जसे गुरू काकडे याने पैसे स्वीकारून पँटच्या खिशात ठेवले असता सपोनि शेंडगे यांनी स्टाफच्या मदतीने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले असता त्याने राकेश रमेश निंबोरे (वय-24, रा.साखरवाडी, ता.फलटण, जि.सातारा) असे सांगितले.
स्वीकारलेली खंडणीची रक्कम गुन्ह्यात वापरलेली वॅगनार एमएच-48 एसी 4626 व अंगझडतीत मिळून आलेला मोबाईल असा एकुण 3 लाख 30 हजर रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीने स्मीता दिलीप गायकवाड (वय-23, रा.फलटण बिरदेवनगर, ता.फलटण, जि.सातारा), आशीष अशोक पवार (वय-27, रा.भुईंज, ता.वाई, जि.सातारा), सुहासीनी योगेश अहिवळे (वय-26, रा. मंगळवार पेठ, फलटण, बिरदेवनगर, ता. फलटण, जि.सातारा) यांचे मदतीने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. यानुसार वरील चौघांवर बारामती शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं.165/2021 भा.द.वि. कलम 384,386, 388,120ब, 506,34 प्रमाणे दाखल करून अटक करण्यात आली आहे.
निंबोरे या आरोपीवर लोणंद, फलटण व बारामती येथे विविध गुन्हे दाखल आहेत. वरील आरोपींपैकी आशीष पवार हा निलंबित पोलीस अधिकारी आहे. या आरोपींनी बारामती शहर व परिसरात प्रतिष्ठीत लोकांवर हनीट्रॅप करून खंडणी वसुल करणारे अनेक गुन्हे केले असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. याबाबत कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी न घाबरता पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे. महिला दिनी महिला पोलीस अधिकारी यांनी हनीट्रॅपचा पर्दाफाश केल्याने वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनच्या सहा.पोलीस निरीक्षक अश्र्विनी शेंडगे, पो.ना.मोरे, श्री.देशमने, पो.कॉ.जाधव, श्री.दळवी, श्री.राऊत व श्री.इंगोले यांनी केली.
हनी ट्रॅप म्हणजे काय?
एखाद्याकडून गुप्त माहिती, पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करून त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात. या पद्धतीला जगभरात सर्वत्र हजारो वर्षांचा इतिहास आहे. गुप्तहेरांपेक्षा हे काम प्रभावी मानलं जातं. दुसर्या महायुद्धाच्या काळातील हनी ट्रॅप खूप गाजले होते. मॅच फिक्सिंग प्रकरणात बुकींकडून असा हनी ट्रॅप लावल्याचे नुकतेच समोर आले होते. मंत्री, व्यावसायिक, खेळाडू या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत.