बारामती सहकारी बँकेची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि 20 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9.00 वा. राजमाता जिजाऊ सभागृह बारामती येथे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, यांचे उपस्थितीत संपन्न झाली.
प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची यांचे वतीने उपाध्यक्ष अविनाश लगड यांनी केले. कोव्हीड 19 च्या साथीमध्ये बाजारपेठामध्ये मंदीचे सावट राहिल्यामुळे आगामी वर्षात जादा कर्जवाटप होऊ शकणार नाही असे उपाध्यक्षांनी सभेपुढे बोलताना सांगितले.
यावेळी बँकेने प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी केल्याबद्दल ना.पवार यांनी समाधान व्यक्त केले. रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कोणत्याही नागरी सहकारी बँकेस सन 2019-20 या आर्थिक वर्षाचा लाभांष देता येणार नाही असे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे बँकेस रु.11.85 कोटी नफा होऊनही सभासदांना लाभांष मिळणार नाही मात्र सदरील लाभांषाची रक्कम बँकेच्या गंगाजळी मध्ये जमा झाल्यामुळे संस्थेच्या स्वनिधीमध्ये रक्कम वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेच्या ठेवी व कर्जे याची वाढ समाधानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. बँकेस लेखापरीक्षण वर्ग अ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात अनेक उद्योगधंदे अडचणीत येत असल्यामुळे कर्जवाटप करताना बँकांनी ती कर्जे सुरक्षित कशी राहतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही पवार यांनी सांगितले.
बारामती सहकारी बँक ही ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी मुख्यालय असलेली एक अग्रगण्य नागरी सहकारी बँक आहे. काही शाखांच्या ठिकाणी ठेवी जास्त संकलित होतात मात्र तेथे कर्जाची मागणी कमी आहे तेथे कर्जवाटप वाढवावे लागेल असे बोलताना ते म्हणाले.
सभेचे कामकाज बँकेचे कार्यकारी संचालक रविंद्र बनकर यांनी विषयपत्रिका वाचून व बँकेचा अहवाल वाचून सुरु केले. सभासदांनी एकमताने सर्व विषय मंजूर केले.
या वर्षी रिझर्व बँकेने संचालक मंडळाव्यतिरिक्त व्यवस्थापकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार बँकेचा कारभार संचालक मंडळ चालवीत असताना त्यांना तज्ञ व्यक्तीचे समावेश असलेले व्यवस्थापकीय मंडळ मदतीसाठी अस्तित्वात येणार आहे. हे व्यवस्थापकीय मंडळ नेमण्यासाठी बँकेच्या उपविधीमध्ये करावयाची दुरुस्ती सभेने एकमताने मंजूर केली.
या सभेस बारामती हाय टेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावाहिनी पवार, नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, पं.स.सभापती सौ.निता बारवकर, छत्रपती कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, सोमेश्र्वर कारखान्याचे पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सदाशिव सातव, सौ.जयश्री सातव, ऍड.सुभाष ढोले, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांसह अनेक मान्यवर, व्यापारी, प्रतिष्ठीत सभासद हजर होते. तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
शेवटी सभेचा समारोप बँकेचे संचालक सुरेशराव देवकाते यांनी आभार प्रदर्शनाने केला.