बारामती(वार्ताहर): मुस्लिम को-ऑपरेटीव्ह बँक लि.पुणे च्या येणार्या पंचावार्षिक निवडणूकीत भ्रष्टाचार हटाव पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे बँकेचे संचालक इम्तियाज शिकीलकर यांनी लेखी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या पत्रकात त्यांनी असेही म्हटले आहे की, बँकेमध्ये पी.ए.इनामदार करीत असलेला मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार, दादागिरी, मुलाला बँकेत करून दिलेला व्यवसाय, बँकेचा फक्त स्वत:साठी वापर, सहकार खाते मार्फत चौकशी सिद्ध झालेला इनामदारचा भ्रष्टाचार सहकार आयुक्ताने रद्द केलेले इनामदारचे संचालक पद इ. मुळे बँकेच्या कारभारावर विपरीत परिणाम झाला आहे. सभासदांना लाभांश नाही. अनेक शाखा तोट्यात, सभासद खातेदारांना बँकेमध्ये सुविधा नाहीत. यामधुन या भ्रष्टाचार युक्त कारभारामधून बँकेला बाहेर काढून बँक पुन्हा प्रगती पथावर पोहचविणे, सभासद खातेदार, कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी सर्व सभासद, खातेदार, समाजातील प्रतिष्ठीत सहकारी व हितचिंतक यांना बरोबर घेऊन येणारी बँकेची निवडणूक जिंकून बँकेच्या प्रगतीसाठी काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.