बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेने आकारण्यात आलेली घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी अशी ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठानने दि.18 फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी यांना लेखी मागणी केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊन, संचारबंदी या सर्व प्रकारात संपूर्ण जगाची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. यामुळे रोजगार, उद्योग, व्यवसाय, नोकर्या यापासुन कित्येकांना मुकावे लागले आहे. कुटुंबाची उपजिवीका भागवता दमछाक होत आहे.
अशा सर्वबाजुने आलेल्या संकटामध्ये तमाम नागरीक सापडलेले आहे. बारामती नगरपरिषदेने घरपट्टी व पाणीपट्टीची आकारणी केलेली आहे. केलेली आकारणी न भरल्यास त्यावर शास्ती (दंड) लावण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीक मेटाकुटीस आलेला आहे. सातारा शहराने जो घरपट्टी व पाणीपट्टी बाबत जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी बारामती नगरपरिषदेत व्हावी अशीही मागणी होत आहे. बारामती नगरपरिषदेने कमीत कमी 1100 स्क्वे.फूटपर्यंतचे सर्व फ्लॅट, घरे व कमीत कमी 300 स्क्वे.फूटपर्यंतचे गाळे शॉपची घरपट्टी व पाणीपट्टी सरसकट माफ करावी व त्यावर लावलेला शास्ती (दंड) रद्द करावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बारामती नगरपरिषदेने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे ब्ल्यू पँथरचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी सांगितले आहे. निवेदन देतेवेळी ब्ल्यू पँथरचे सचिव अक्षय शेलार, कार्याध्यक्ष मयुर कांबळे, विक्रम पंत थोरात, रोहित भोसले, नारायण लांडगे, केशव शेलार, आकाश पोळके, अनिस शेख, अमीर शेख इ. कार्यकर्ते उपस्थित होते.